दहिवडी : बिजवडी येथील विकास सेवा सोसायटी संचलित जनावरांच्या चारा छावणीमधील भ्रष्टाचार प्रकरणातील दहिवडी पोलिसांच्या अटकेत असलेले संशयित आरोपी सोसायटीचे चेअरमन यशवंत नामदेव शिनगारे व सचिव विकास दिनकर भोसले या दोघांना रविवारी अटक करण्यात आली होती. त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता रविवार, दि. ३० पर्यंत पोलीस कोठडीचा आदेश दिला.
माण तालुक्यातील चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी तक्रार दाखल केली होती. दहिवडी न्यायालयाने यशवंत शिनगारे व विकास भोसले यांच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याचा आदेश ६ मार्च २०२१ रोजी दिला होता. त्यानंतर हे दोघेही हजर झाले नव्हते. त्यांनी वरिष्ठ न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर रविवारी त्यांना अटक केली होती. याकामी सरकारी वकील तरंगे व फिर्यादीच्यावतीने वकील नितीन गोडसे यांनी काम पाहिले. दहिवडीचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करीत आहेत.