सातारा : अवघ्या सतराव्या वर्षी अत्याचारामधून जन्माला आलेल्या बाळासह ‘तिची’ फरफट सुरू आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर असताना औंध पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून न घेता उलट तिचे संबंधित तरुणाबरोबर लग्न लावण्यात पुढाकार घेतला, असा आरोप मुलीच्या नातेवाइकांनी केला आहे. लग्नादिवशीच पसार झालेला अत्याचारी युवक अद्याप फरारी असून, ‘मनोधैर्य’ योजनेतून एक पैसाही मदत न मिळाल्याने मुलीची अवस्था केविलवाणी झाली आहे.आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत घरात जन्मलेल्या या मुलीचे आई-वडील शेतमजूर आहेत. वयाच्या सतराव्या वर्षीच ती गर्भवती राहिल्याचे समजल्याने आई-वडील खचले. अत्याचारातून हा प्रकार घडल्याचे मुलीने सांगताच आरोपी धनाजी लालासाहेब पाटोळे या तरुणाला सोबत घेऊन ते औंध पोलीस ठाण्यात गेले. परंतु पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून घेतला गेला नाही. उलट, पाटोळे संबंधित मुलीशी लग्न करण्यास तयार आहे, असे सांगून पोलिसांनीच हे लग्न जुळवून आणले, असा आरोप तिच्या आई-वडिलांनी पत्रकारांशी बोलताना केला.अत्यंत कठीण परिस्थितीत या कुटुंबाने सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षा देशपांडे यांच्याकडे धाव घेतली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पाटोळे फरारी झाल्यानंतर पाच दिवसांनी २१ डिसेंबर रोजी त्यांनी औंध पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर महिला-बालकल्याण विभागात ‘मनोधैर्य’ योजनेंतर्गत मदतीसाठी अर्जही केला. तथापि, नुकत्याच झालेल्या या विभागाच्या बैठकीत जिल्ह्यातील २२ पैकी एकही प्रकरण मंजूर झाले नाही.संबंधित मुलीला मुलगी झाली असून, ती आता दोन महिन्यांची आहे. अत्याचारप्रकरणी आरोपीस तातडीने पकडावे आणि ‘मनोधैर्य’ योजनेंतर्गत मदत मंजूर व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी आणि राज्य महिला लोक आयोग या संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी)‘पाचगणी’चे आरोपपत्र न घेण्याचे आवाहन पाचगणीत अडीच वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा राज्य महिला लोक आयोग संघटनेने तीव्र शब्दांत निषेध केला असून, आरोपीला जामीन मिळू नये, यासाठी जिल्हा सरकारी वकिलांना अर्ज केला आहे. तसेच अत्यंत चीड आणणाऱ्या या प्रकरणात सामाजिक बांधिलकी म्हणून आरोपीचे वकीलपत्र कोणी घेऊ नये, असे आवाहन वकिलांना केले आहे.संबंधित अल्पवयीन मुलीच्या लग्नाशी पोलिसांचा काहीही संबंध नाही. पोलीस ठाण्यात अत्याचाराचाच गुन्हा दाखल झाला असून, त्यानुसारच तपास सुरू आहे. लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात येईल.- उदय देसाई,सहायक पोलीसनिरीक्षक, औंध
अत्याचारपीडित मुलीशी लावले आरोपीचे लग्न !
By admin | Published: March 19, 2015 12:07 AM