सातारा: कोरेगाव तालुक्यातील वडाचीवाडी येथून एका युवकाचा खून करून फरार झालेल्या संशयिताला सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगली जिल्ह्यातील विटा येथून अटक केली.
लखन ईश्वर मोरे (वय ५५, रा. साळशिरंबे, ता. कराड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लखन मोरे याने पत्नीशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयातून वडाचीवाडी येथे विकास बबन मोरे (रा. वडाचीवाडी) या युवकाचा दि. १५ रोजी रात्री १२ वाजता डोक्यात दगड घालून खून केला होता. याबाबतची तक्रार लखन याची पत्नी मंगल मोरे हिने कोरेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. या घटनेनंतर लखन फरार झाला होता. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. त्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे हे करत होते.
दरम्यान, युवकाचा खून झाल्यानंतर एलसीबीचे पथकही संशयित आरोपीचा शोध घेत होते. संशयित लखन हा सांगली जिल्ह्यातील विटा येथे त्याच्या नातेवाईकाकडे असल्याची माहिती मिळाली. यानंतर एलसीबीच्या पथकाने रविवारी रात्री विटा येथे जावून त्याला अटक केली. त्यानंतर लखनला कोरेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, जोतिराम बर्गे, तानाजी माने, पोलीस हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पोलीस नाईक शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, अमित सपकाळ, नीलेश काटकर, प्रमोद सावंत, गणेश कापरे, विक्रम पिसाळ आदींनी सहभाग घेतला.