कऱ्हाडनजीक गजानन हाउसिंग सोसायटीमध्ये असलेल्या व्यसनमुक्ती केंद्रात दोन दिवसांपूर्वी मारामारी झाली होती. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एकाने दुसऱ्या कामगारावर धारदार शस्त्राने वार केले होते. त्यामध्ये युवक गंभीर जखमी झाला होता. या गुन्ह्याबाबत कऱ्हाड शहर पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर हल्लेखोरावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गत दोन दिवस पोलीस संबंधित गुन्ह्याकामी आरोपीकडे कसून चौकशी करीत होते.
दरम्यान, गुरुवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले, तसेच त्याची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. त्यावेळी रॅपिड चाचणीत संबंधित आरोपीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. पोलिसांनी याबाबतची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गत दोन दिवसांपासून संबंधित आरोपीच्या संपर्कात असलेल्या पोलिसांचे धाबे दणाणले असून, संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.