सातारा : सांगली पोलिसांच्या पथकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंड दत्ता जाधव याच्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने साताऱ्यात सापळा रचून अटक केली. दीपक अण्णा लोंढे, धनराज ऊर्फ धनू ज्ञानदेव बडेकर (दोघेही रा. प्रतापसिंहनगर, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जत तालुक्यातील प्रतापपूर येथे पीर यात्रेमध्ये गुंड दत्ता जाधव हा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सांगली आणि सातारा पोलिसांनी दत्ता जाधवला पकडण्यासाठी सापळा लावला.यावेळी दत्ता जाधव आणि त्याच्या साथीदारांनी उलट पोलिसांवरच हल्ला केला. एवढेच नव्हे तर पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. दत्ता जाधव व त्याच्या साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता.दरम्यान, दीपक आणि धनराज हे दोघे बुधवारी रात्री साताऱ्यातील प्रतापसिंहनगरमध्ये आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन टीम तयार करून दोघांच्या घराला वेढा दिला.
घरात घुसून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या दोघांनी सांगली येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असल्याची कबुली दिली. या दोघांनाही पुढील तपासासाठी जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.