महाबळेश्वर : महाबळेश्वर अर्बन को-आॅप बँकेस १८ लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपींच्या तपासासाठी गेलेले पोलीस पथक केवळ बँकांची कागदपत्रे घेऊन पुण्याहून महाबळेश्वरात दाखल झाले. आरोपींचा शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.एक महिला व दोन पुरुषांनी येथील अर्बन बँकेस धनादेशात खाडाखोड करून गुजरात राज्यात धनादेश वटवून बँकेची फसवणूक केली होती. नुकतेच पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी पुणे येथे जाऊन आरोपींच्या राहण्याची जागा, बँकेतील खाती व खाते उघडल्यासाठी दिली गेलेली कागदपत्रे तपासली. तपासात आंबेगाव (पुणे) येथे वास्तव्याचा दिलेला पत्ता खरा असला तरी अनामत रक्कम देऊन जागा घेतली होती. मात्र, आरोपी तेथे कधीच राहिला नाही. केवळ बँक खाती उघडण्यासाठी या जागेच्या पत्त्याचा वापर केला. खाते उघडताना सध्याच्या नियमानुसार आधारकार्ड किंवा पॅनकार्डची आवश्यकता असल्याने आरोपींनी सहज खाती उघडली होती. पॅनकार्डबाबत शहानिशा करण्याचे पोलिसांनी निश्चित केले असून आरोपी सराईत असून अत्यंत सफाईदारपणे कोणतेही धागेदोरे न ठेवल्याने पोलीस चक्रावून गेले आहेत. पुणे येथील बँक आॅफ बडोदा येथून आरोपींनी तातडीने रक्कम काढली होती. त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाबळेश्वर येथे अर्बन बँकेत धनादेश काढणारी व्यक्तीच खात्यातून रक्कम काढताना फुटेजमध्ये दिसून आली आहे. गुन्हा होऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप आरोपी पोलिसांना सापडले नाहीत. (प्रतिनिधी)
आरोपी पकडायला गेले; कागदपत्रे घेऊन आले
By admin | Published: March 22, 2015 10:57 PM