कऱ्हाड : कोरोना लढ्यात छातीची ढाल करून लढणाऱ्या पोलिसांचा जीव स्वस्त आहे का, असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक केलेले आरोपी पोलिसांच्या संपर्कात असतात; पण त्या आरोपींची कोरोना चाचणीच होत नाही. ज्यावेळी त्याला तुरुंगात टाकण्याची वेळ येते, त्याच वेळी त्याची तपासणी होते. मात्र, तोपर्यंत संबंधित आरोपींमुळे पोलीसच बाधित होण्याची भीती असून याचे कोणालाच गांभीर्य नाही, हे दुर्दैव.
कारागृहात आरोपींना कोरोनाची बाधा होण्याच्या घटना वारंवार घडतात; पण कऱ्हाडात पोलिसांनी अटक केलेला आरोपीच बाधित आढळल्याची घटना घडली. संबंधित आरोपी तीन दिवस पोलिसांच्या संपर्कात होता. शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेसह पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील बहुतांश कर्मचारी त्या आरोपीच्या निकट सहवासात होते. सध्या संबंधित कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणलेत. आपल्याला बाधा झाली नसेल ना, हा प्रश्न त्यांना सतावतोय. वास्तविक, पोलिसांसाठी असा जिवावरचा प्रसंग नवीन नाही. वारंवार त्यांना वेगवेगळे धोके पत्करावे लागतात; पण कोरोनाचा धोका कुणालाच परवडणारा नाही. कोरोनामुळे त्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबालाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.
एखाद्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या अथवा अटक केलेल्या आरोपीची सध्या कोरोना चाचणी होत नाही. केवळ त्या आरोपीला लक्षणे आहेत का, एवढीच तोंडी विचारणा केली जाते. आरोपीने लक्षणे नाहीत, असे सांगितल्यानंतर केवळ त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून पोलीस पुढील कारवाई करतात. संबंधित आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली तर तपासी अधिकाऱ्यासह अनेक पोलीस कर्मचारी त्या आरोपीच्या संपर्कात राहतात. जोपर्यंत त्याची पोलीस कोठडीची मुदत संपत नाही तोपर्यंत त्याच्याकडे वेगवेगळ्या मुद्द्यांवर तपास होतो. जबाब नोंदविला जातो आणि ज्यावेळी त्याची कोठडीची मुदत संपते त्यावेळी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाते. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आरोपीच्या इतर वैद्यकीय तपासणीबरोबरच कोरोनाची चाचणीही केले जाते. आणि त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी होते. मात्र, जोपर्यंत त्याची चाचणी होत नाही तोपर्यंत पोलीस त्याच्या संपर्कात आलेले असतात. आणि जर आरोपी बाधित असेल तर त्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांसह त्यांच्या कुटुंबालाही धोका निर्माण होतो.
- चौकट
तोंडी चौकशीने निदान कसं होणार..?
अटक केल्या जाणाऱ्या आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्याचा नियम आहे. त्यानुसार शासकीय रुग्णालयात तपासणी होतेही; पण त्यावेळी फक्त त्याचा रक्तदाब तपासला जातो. कोरोनाची लक्षणे आहेत का, याची केवळ तोंडी विचारणा होते. मात्र, बहुतांश वेळा रुग्णाला कसलीच लक्षणे नसतानाही कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोपीकडे केवळ तोंडी चौकशी करून त्याला कोरोना झाला आहे की नाही, याचं निदान कसं होणार, हा प्रश्न आहे.
फोटो : १७केआरडी०४
कॅप्शन : प्रतीकात्मक