लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती झाली आहे. ती उंचावण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. ही परंपरा टिकविण्यासाठी काळानुरूप बदलणारी शैक्षणिक पद्धती आत्मसात केली पाहिजे. चांगला नागरिक घडविण्यासाठी मूल्यवर्धित शिक्षण देणे गरजेचे आहे. देशाला, राज्याला उपयोगी ठरतील असे विद्यार्थी घडवा,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात जिल्ह्यातील १२ शिक्षकांना आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दीपक चव्हाण होते. मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सभापती राजेश पवार, मनोज पवार, शिवाजी सर्वगोड, वनिता गोरे, पंचायत समित्यांचे सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य, प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास कुलाळ, क्रीडाधिकारी सुहास पाटील आदी उपस्थित होते.
आमदार चव्हाण म्हणाले, ‘शिक्षकांना पुरस्कार देणे ही चांगली परंपरा आहे. मात्र, ज्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यांचे काम चांगले नाही, असे नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये काहीच मुले चमकत आहेत. इतरही विद्यार्थी त्यात पुढे यावेत, ही शिक्षकांची भूमिका हवी.’कैलास शिंदे म्हणाले, ‘शिक्षकांनी काय साध्य केले? काय साध्य केले पाहिजे?, याचे आत्मचिंतन करण्याचा हा दिवस आहे.’या कार्यक्रमात शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थी, २२ तंत्रस्नेही शिक्षक, स्वच्छ विद्यालय स्पर्धेत देशात तृतीय क्रमांक मिळविलेली शेंडेवाडी शाळा, हरिश्चंद्र गोरे यांचा सत्कार करण्यात आला.पुरस्कारप्राप्त शिक्षक...विद्या लोंढे (सोनगाव संमत निंब, ता. सातारा), गणपत जाधव (चतुरबेट, ता. महाबळेश्वर), शरद यादव (धावडी, ता. वाई), संगीता पवार (बावडा, ता. खंडाळा), रामदास गोळे (मार्ली, ता. जावळी), सुरेखा भोसले (उंब्रज मुलींची शाळा, ता. कºहाड), सुनीता नांगरे (बेलावडे, ता. पाटण), शिवाजी चव्हाण (शिरढोण, ता. कोरेगाव), रमजान इनामदार (मायणी, ता. खटाव), चंद्रकांत जाधव (जांभूळणी, ता. माण), भोलचंद बरकडे (कर्णेवाडी, ता. फलटण), गणपत भालेकर (विशेष पुरस्कार टोळेवाडी, ता. पाटण)