मायणी : मायणी गावास येरळवाडी मध्यम प्रकल्पातून असलेल्या प्रादेशिक योजनेचा वीजपुरवठा थकीत वीजबिलामुळे खंडित झाल्याने गावातील उपनगरांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती, ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत तीन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या असून, या विहिरीतून उपनगरांना पाणीपुरवठा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र शेती वीज वेळापत्रक पत्रकानुसार वीजपुरवठा काही दिवस रात्री व काही दिवस दिवसा असल्याने थोड्याफार अडचणी येत आहेत.
मायणी गावास पाणीपुरवठा करण्यासाठी येरळवाडी मध्यम प्रकल्पातून मायणी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. मात्र, या योजनेचे प्रचंड वीजबिल येत असल्याने या योजनेची थकबाकी तीन कोटींवर गेली आहे. वीजवितरण कंपनीने या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा वीजपुरवठा थकीत बिलाचे कारण दाखवून बंद केला.
त्यामुळे मायणी गावातील वडूज रोड, मरडवाक रोड, नदाफ कॉलनी, विघ्नहर्ता कॉलनी, श्रीराम कॉलनी, मोराळे रोड, यशवंतनगर, शिक्षक कॉलनी, सराटे मळा यांसह कचरेवाडी व फुलेनगर परिसरातील उपनगरामध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांना पिण्यासाठी तसेच रोजच्या वापरण्यासाठी ऐन पावसाळ्यात पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. ऐन पावसाळ्यामध्ये पाणी ग्रामस्थांना देता येत नसल्याने ग्रामपंचायतीवर ही थोडी नामुष्की ओढवली होती.
यावर मार्ग काढण्यासाठी मायणी ग्रामपंचायतीमार्फत येथील मरडवाक रोडलगत असलेले शेतकरी पांडुरंग झगडे, जालिंदर माळी व राजाराम कचरे यांच्या स्वमालकीच्या विहिरी गावाला पिण्याचे पाणी देण्यासाठी अधिग्रहण केल्या. या विहिरीतून पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीजवळ पाईपलाईन जोडून यातून या उपनगरांना पाणी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हे पाणी देत असताना विहिरीवरील वीज शेतीपंपाची असल्याने आठवड्यातील काही दिवस रात्रीच्या वेळी वीजपुरवठा असतो, तर काही दिवस दिवसा वीजपुरवठा असतो, त्यामुळे पाणी देण्याचे वेळापत्रक बसवताना ग्रामपंचायतीला प्रचंड अडचण निर्माण होत आहे.
चौकट..
सुरळीत पाणीपुरवठा केल्याने संकट टळले..
विहिरीतून थेट पाणी पाईपलाईनद्वारे दिले जात असल्याने पुरेसा दाब नसल्याने संपूर्ण उपनगरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मात्र, ग्रामपंचायतीने प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना बंद असतानाही ग्रामस्थांची पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून अशा प्रकारे तातडीने निर्णय घेऊन पाणीपुरवठा सुरळीत केल्यामुळे ग्रामस्थांचे तूर्तास पाणीसंकट टळले आहे.
चौकट -
शेतकऱ्यांकडून विनामोबदला पाणीपुरवठा
प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना बंद असल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे येथील पांडुरंग झगडे, जालिंदर माळी व राजाराम कचरे यांनी स्वमालकीच्या विहिरीतील विनामोबदला ग्रामपंचायतीस पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाणी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्व ग्रामस्थांकडून यांचे कौतुक होत आहे.