सातारा : जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून दाखल केलेल्या गुन्ह्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह त्यांच्या ४८ समर्थकांची न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्तता केली.
आनेवाडी टोलनाका प्रशासन चालवण्यास देण्याच्या कारणावरून वाद सुरू होता. यादरम्यान शासकीय विश्रामगृहासमोर ६ ऑक्टोबर २०१७ रोजी सायंकाळी जमाव मोठ्या संख्येने एकत्र आला होता. त्याच दिवशी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश काढला होता. त्याचे उल्लघंन केल्याचा ठपका ठेवून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह ४८ जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुसरे तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधीश साळवे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्यावतीने पाच पोलिस साक्षीदार म्हणून तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह ४८ जणांची निर्दोष मुक्तता केली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने ॲड. वसंत नारकर, शिवराज धनावडे यांनी कामकाज पाहिले. शिवेंद्रसिंहराजे हे निकाल ऐकण्यासाठी गुरुवारी दुपारी स्वत: न्यायालयात हजर होते.
हे जमले होते शासकीय विश्रामगृहावर
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन ॲड. विक्रम पवार, माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, फिरोज पठाण यांच्यासह ४८ जणांवर ११ ऑक्टोबर २०१७ रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.