सातारा : ‘राज्यातील सरकार हे जनतेचे सरकार आहे याचे भान अधिकारी वर्गाने ठेवले पाहिजे. कोरोना संकटकाळात लोकांचे मनोबल भक्कम राहण्यासाठी शासन यंत्रणेतील प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागले पाहिजे. अन्यथा शिवसेना स्टाइलने संबंधितांचा समाचार घ्यावा लागेल,’ असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी दिला आहे.
चंद्रकांत जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोनाचे संकट गंभीर बनले असून, दररोज दोन हजारांवर नवीन रुग्ण निष्पन्न होत आहेत. रुग्णांना बेड मिळण्यासाठी, रेमडेसिविर मिळविण्यासाठी नातेवाइकांची ससेहोलपट होत आहे. लोक किड्यामुंग्यांसारखे मरत आहेत. त्यानंतरही त्यांची उपेक्षा सुरूच आहे. कारण अंत्यसंस्कारासाठी मृतांना वेटिंग करावे लागत आहे. काही मृतांच्या घरातील लोक पॉझिटिव्ह आल्याने ते वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत आहेत. एखादा रुग्ण मृत झाल्याचे सांगितले गेल्यावर अंत्यसंस्कार होण्यासाठी मृताचे नातेवाईक संबंधित रुग्णालयाच्या परिसरात दोन-दोन दिवस उपाशीपोटी ताटकळत आहेत.
चौकट
अग्निकुंड वाढवा, विद्युतदाहिनी बसवा
सातारा येथे कैलास स्मशानभूमीत सध्या २५ अग्निकुंड असून, पैकी १४ कोरोनाने मृत्यू झालेल्यांसाठी आहेत, तर ११ नॉनकोविड मृतांसाठी आहेत. ही अंत्यसंस्काराची व्यवस्था अपुरी पडत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अन्य ठिकाणी आणखी अग्निकुंड किंवा विद्युतदाहिनीची व्यवस्था करण्याची गरज असूनही प्रशासन ढिम्म आहे.