रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथील वनहद्दीतील रोपवनातील गवतात विनापरवाना म्हशी चरायला सोडल्याप्रकरणी वनविभागाच्यावतीने तिघांकडून १२०० रुपये दंड वसूल केला आहे.
पवारवाडी येथील वनविभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. योग्यप्रकारे निगा राखली जात असल्याने झाडांची चांगल्या पद्धतीने वाढ सुरू आहे. कोवळ्या रोपांना जनावरांपासून इजा पोहोचू नये, यासाठी वनहद्दीत चराईबंदी व कुऱ्हाडबंदी लागू करण्यात आली आहे. वनविभागाच्या या आदेशाचे उल्लंघन करून काही पशुपालक विनापरवाना रोपवनात जनावरे चरण्यासाठी सोडत आहेत. रोपांच्या अस्तित्वासाठी वनविभागाने गेल्या पंधरा दिवसांत रोपवनात जनावरे चरावयास सोडलेल्या तिघांवर रहिमतपूरचे वनपाल अनिल देशमुख यांनी दंडात्मक कारवाई केली. प्रतिम्हैस दोनशे रुपये याप्रमाणे सहा जनावरे सोडल्याप्रकरणी पवारवाडी येथील संबंधित तीन शेतकऱ्यांकडून बाराशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. रोपवनात जनावरे सोडल्यास रोपांना जनावरे शिंगाने घासतात व तुडवतात त्यामुळे रोपांची वाढ थांबून त्यांना इजा पोहोचते. यामुळे शासनाचे ध्येय साध्य होत नाही. कारवाईपूर्वी अनेक शेतकऱ्यांना वारंवार समज देण्यात आली होती तरीही सूचनांकडे दुर्लक्ष करून जनावरे सोडल्याने नाईलाजास्तव दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या जनावरांना पुरेसे गवत उपलब्ध व्हावे, यासाठी वनविभागाच्यावतीने वनहद्दीतील गवत कापून नेण्यास पशुपालक शेतकऱ्यांना परवानगी देण्यात आली असल्याची माहिती वनरक्षक नवनाथ कोळेकर यांनी दिली.