सातारा : कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने प्रशासनाकठून ठोस पावले उचलण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाई शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांसह वाहनधारकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण ५० नागरिकांवर कारवाई करून २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढू झाली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्याचे आव्हान निर्माण झाल्याने शासनाने नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन नागरिकांचा केले आहे; परंतु नागरिकांकडून ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही. सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणे, मास्कचा वापर न करणे असे प्रकार नागरिकांकडून सातत्याने केले जात आहे. अशा नागरिकांवर अंकुश लावण्यासाठी वाई पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.
पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी किसन वीर चौक, बसस्थानक परिसर, महागणपती चौक, भाजी मंडई सह्याद्रीनगर नाका आदी ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांसह एकूण ५० जणांवर कारवाई करून २५ हजारांचा दंड वसूल केला. नागरिकांची शासन नियमांचे पालन करावे, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिला.