वडूज : अंबवडे (ता. खटाव) येथील येरळा नदीच्या पात्रात येरळा तलावाच्या भरावालगत विनापरवाना वाळूउपसा व चोरीप्रकरणी डांभेवाडी व गोरेगावच्या सरपंचांसह पाच जणांवर वडूज पोलिसांनी कारवाई केली. सातपैकी पाच जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अंबवडे (ता. खटाव) हद्दीतील येरळा नदीच्या पात्रात येरळा तलावाच्या भरावालगत विनापरवाना वाळूउपसा सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना समजली. ही ठिकाणी धाड टाकण्यासाठी वडूज पोलीस ठाण्याची पथके तयार करण्यात आली. यामध्ये पोलीस हवालदार आण्णा मारेकर, संदीप शेडगे, सत्यवान रवाडे, दीपक देवकर, पाच ते सहा होमगार्ड या कारवाईत सामील होते.
विनापरवाना वाळूउपसाप्रकरणी अन्वर शेख (रा. वडूज), सुशीलकुमार डोईफोडे (रा. गोरेगाव), सोमनाथ भोसले (रा. वडूज) विलास सुर्वे (रा. पिंपरी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन डंम्पर, एक जेसीबी, एक ट्रॅक्टर व दुचाकी वडूज पोलिसांनी जप्त केली. नीलेश जाधव तसेच वाळू वाहतूक किशोर बागल याच्या सांगण्यावरून करीत असल्याचे संबंधितांनी सांगितले.
त्याचप्रमाणे सिद्धेश्वर कुरोली येथे मोडे नावाच्या शिवारात कालव्याजवळ विनापरवाना वाळूउपसा करताना स्वप्नील इंदापूुरे मिळून आला. दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या अवैध वाळूउपसा कारवाईमध्ये ५१ लाख ४६ हजार किमतीच्या मुद्देमालासह वाहने वडूज पोलिसांनी जप्त करून कारवाई केली.
विनापरवाना वाळू वाहतूकप्रकरणी डांभेवाडी व गोरेगावच्या सरपंचांसह पाच जणांवर वडूज पोलिसांनी कारवाई करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने पाच जणांना एकदिवसीय पोलीस कोठडी सुनावली. पोलीस हवालदार विपुल भोसले व आनंदा कदम तपास करीत आहेत.
फोटो ..
डांभेवाडीसह गोरेगाव येथे विनापरवाना वाळूउपसा प्रकरणी वडूज पोलिसांनी वाहने जप्त केली. (छाया : शेखर जाधव)