कातरखटाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. योग्य ती अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले असताना, कातरखटाव येथे नियमाचे पालन न करणाऱ्या दुकानदारावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. यामध्ये साडेसहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
गतवर्षापासून कोरोनामुळे सर्वसामान्य व्यापाऱ्यांचे, जनतेचे आर्थिक बाजूने कंबरडे मोडले आहे. महापुरासारखी कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे, ‘धरलं तर चावतंय.. सोडलं तर पळतंय’, अशी प्रशासनाची अवस्था झाली आहे. व्यापारी व सर्वसामान्यांची हीच अवस्था होऊन बसली आहे. दुकाने बंद ठेवावीत तर प्रपंचाचा गाडा, उदरनिर्वाह चालवायचा कसा? गाळाभाडे, लाईट बिल, जीवनावश्यक वस्तू, बँका, फायनान्स हफ्ते, हे चुकलेलं नाही. उद्या चक्रवाढ व्याज लावून पतसंस्था, बँकवाले, तुमचे एवढे थकीत म्हणून नोटीस पाठवणार. फायनान्सवाला दारात येऊन बसणार. अशा समस्यांना व्यापारी वर्गाला सामोरे जावे लागत असल्यामुळे प्रशासनाची नजर चुकवून चार पैसे कमवायला जात आहेत. नागरिक नकळत दुकानासमोर गर्दी करतात. यामुळे मात्र दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. कातरखटाव येथे विनामास्क, काहीही काम नसताना भटकंती करणाऱ्या दहा ते बारा जणांवर, किराणा दुकान, कापड दुकानदारांनी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे प्रशासनाच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. दिवसभर लपून - छपून कमावले आणि कारवाईची पावती फाडल्यामुळे पाच मिनिटात गमावले, असे अनुभव सध्या अनेक दुकानदारांना येत आहेत. या कारवाईत सागर लोखंडे, संतोष काळे, गौरव देशमुख, अंकुश पवार, पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
फोटो आहे....
फोटो ओळ :
कातरखटाव, ता. खटाव येथे दुकानदारावर कारवाई केल्यानंतर दंडाची पावती देताना पोलीस कर्मचारी.. (छाया : विठ्ठल नलवडे )