वाई : पोलिसांनी शहरात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला असतानाही शहरात विनाकारण फिरणारे नागरिक, दुचाकी व चारचाकीधारकांवर धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये ४३ हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करून २१ हजारांहून अधिक दंड वसुल केल्याची माहिती वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिली.
वाईमध्ये मंगळवारी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने किसनवीर चौक, एसटी बसस्थानक परिसर, महागणपती चौक, भाजी मंडई, सह्याद्रीनगर नाका आदी ठिकाणी ही कारवाई केली. यामध्ये अनावश्यक वाहने रस्त्यावर दिसल्यावर कारवाई करण्यात येत होती. बाधितांची संख्या वाढत असून, नियम न पाळल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. शहरात विनाकारण, विनामास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई सुरू असून, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक खोबरे यांनी दिला आहे.