वाई : विनापरवाना लाकडी कोळशाची वाहतूक करणाऱ्यावर वाई वनपरिक्षेत्र विभागाने कारवाई करून टेम्पो व लाकडी कोळसा मालासह ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वाई वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी यांना मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री ते शहरात गस्त घालत असताना अडीच वाजण्याच्या सुमारास वाई रविवार पेठ हद्दीत टेम्पो (एमएच १० - झेड ४०८१) या वाहनाची तपासणी केली. तेव्हा वाहनात लाकडी कोळसा आढळून आला. टेम्पोचालक आरोपी सुधीर सुरेश मोरे (रा. कहावागज, ता. बारामती, जि. पुणे) याच्याकडे लाकडी कोळसाच्या वाहतुकीसाठी परवाना नसल्याने त्याच्यावर भारतीय वनअधिनियम, १९२७ चे कलम ४१, (२), (ब) अन्वये वनपाल वाई यांचेकडील वनगुन्हा नोंद केला आहे. तसेच लाकडी कोळसा मालासह टेम्पो जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सातार उपवनसंरक्षक एम. एन. मोहिते, वनसंरक्षक (वनीकरण) सचिन डोंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे, वनपाल सुरेश पटकारे, वनरक्षक वैभव शिंदे, सुरेश सूर्यवंशी, वसंत गवारी, वनसेवक महेंद्र मोरे यांनी केली.
३०वाई-कोळसा
वाई हद्दीतून विनापरवाना कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनावर वनविभागाने कारवाई केली. (छाया : पांडुरंग भिलारे)