वाई : ‘वाईच्या पश्चिम भागात वणवा लावण्याचे प्रमाण अधिक असून, वनविभागाने संपूर्ण वर्षभरात जाहिराती, फ्लेक्स, नोटीस, जाळपट्टे तयार करून तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वणव्यामुळे पर्यावरणाचा कसा ऱ्हास होतो, याचे प्रबोधन करूनही वणवा लावणाऱ्यांची मुजोरी थांबली नाही. यापुढे वनविभागाच्या डोंगरांना वणवा लागल्यास शेजारी मालकीचा डोंगर असणाऱ्यांवर वणवा विरोधी कडक कारवाई करण्यात येणार आहे,’ असे प्रतिपादन वाई वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप बुधनवर यांनी केले.वाईच्या पश्चिम भागात बोरगाव येथील माध्यमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वाईच्या पश्चिम भागात वणवा लावणाऱ्यांचे प्रमाण मोठे असल्याने वनविभागही पश्चिम भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून परिसरातील शेतकऱ्यांना वनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रबोधन करत आहे. त्या अनुषंगाने बोरगाव येथील माध्यमिक शाळेत नांदगणे, परतवडी, बलकवडी, उळुंब गावांचा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बोरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीकांत वाघ, वनपाल चंद्रकांत कांबळे, नांदगणेचे सरपंच पोपटराव मोरे, वनपाल प्रदीप शेवते, संभाजी दहिफळे, प्रकाश बाबर, वैभव शिंदे, सदानंद राजापुरे, रामचंद्र देसाई, संजय चव्हाण, भि. वा. खुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.वनक्षेत्रपाल बुधनवर म्हणाले, ‘वनविभागाच्या वनक्षेत्रात १५ फुटांपर्यंत जाळपट्टे तयार केले जातात. अशा पद्धतीने वनाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातात, तरीही या भागात स्वत:च्या मालकीचे डोंगर असणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने गैरसमजुतीतून वणवा लावल्याने शेजारीच असणाऱ्या वनविभागाच्या वनक्षेत्राला त्याची झळ पोहोचते. या भागातील ग्रामपंचायतीने व स्थानिक नागरिकांनी या समाज कंटकांना वणवा लावण्यापासून रोखण्यासाठी वनविभागाला सहकार्य करावे.’ कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोरगाव येथील माध्यमिक शाळेत फ्लेक्स चे उद्घाटन शाळेतील हरित सेनेच्या विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी तसेच स्थानिक नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्रीकांत वाघ यांनी वनविभाग अधिकाऱ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या मार्फत या परिसरामध्ये वणवा विरोधी जास्तीत-जास्त प्रबोधन करण्याचे आश्वासन दिले. आंतरराष्ट्रीय वनदिन साजरा करण्यासाठी वनविभागाच्या सर्व विभागातील कर्मचारी व सेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे हरित सेनेच्या शिक्षिका रूपाली शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)सध्या डोंगराळ भागामध्ये गैरसमजुतीतून व समाज कंटाकांच्या सूड भावनेतून वाईच्या पश्चिम भागात अनेक डोंगर वणव्याच्या भक्षस्थानी पडून ओसाड झाले आहेत. वणव्यामुळे जनावरांचा चारा, सरपटणारे प्राणी, पशु-पक्षी, मोकाट जनावरे यांना मोठी झळ पोहोचते. तसेच त्यामुळे वनविभागाच्या वनक्षेत्राचे न भरून निघणारे नुकसान होत आहे.-चंद्रकांत कांबळे ( वनपाल, पश्चिम भाग)
वणवा लावणाऱ्यांवर आता कारवाई
By admin | Published: March 28, 2016 11:33 PM