कऱ्हाड : येथील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बुधवारी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय परिसरात दुचाकीसह चारचाकी वाहनधारकांवर कारवाईची मोहीम राबविली. यावेळी पन्नासपेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करून सुमारे १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.कऱ्हाड शहर वाहतूक शाखेकडून बुधवारी कारवाईची मोहीम राबविण्यात आली. शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोरील सिग्नल परिसरात वाहतुक नियमांचे पालन न करणे, विना परवाना वाहन चालविणे, ट्रिपल सीट, वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करणे, फॅन्सी नंबर प्लेट, नंबर प्लेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली. तसेच चारचाकी वाहनधारकांवरही कारवाई करण्यात आली. विनापरवाना माल वाहतूक, खराब नंबरप्लेट, सीटबेल्ट नसणाऱ्या चारचाकी वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत पोलिसांची ही मोहीम सुरू होती.उपजिल्हा रुग्णालयासमोरील चौकाबरोबरच कृष्णा नाका येथेही पोलिसांनी ही मोहीम राबविली. सिग्नल तोडणाऱ्या काही दुचाकीस्वारांनाही यावेळी कारवाईला सामोरे जावे लागले. काहीजण विना हेल्मेट, तसेच ट्रिपल सीट प्रवास करताना आढळले. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. दोन तासांत पोलिसांनी सुमारे बारा हजार रुपयांचा दंड केला.
पन्नासपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, १२ हजार दंड वसूल; कऱ्हाड वाहतूक शाखेची कारवाई
By दीपक शिंदे | Published: June 19, 2024 5:02 PM