सातारा : फूटपाथ व रस्त्यावर बसून भाजी विक्री करणाऱ्या बारा विक्रेत्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. संबंधितांचा भाजीपाला, वजन काटे व इतर साहित्य पथकाने जप्त केले.
शहरातील फूटपाथ तसेच रहदारीच्या प्रमुख मार्गांवर भाजी विक्रेत्यांनी बस्तान बसविले आहे. विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने वाहतूककोंडीची समस्याही गंभीर बनू लागली आहे. शहरातील राजवाडा बसस्थानक ते मंगळवार तळे या मार्गावरील भाजी विक्रेत्यांमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. रस्त्यावर भरणाऱ्या या मंडईमुळे हा मार्ग नागरिकांनी नेहमीच गजबजलेला असतो. शिवाय वाहतुकीची कोंडीही होत असते. या समस्या लक्षात घेता सोमवारी सकाळी अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्या पथकाने मंगळवार तळे मार्गावरील भाजी विक्रेत्यांवर कारवाई केली.
या कारवाईत विक्रेत्यांचा भाजीपाला तसेच काहींचे वजन काटे व इतर साहित्यही जप्त करण्यात आले. वारंवार कारवाई करूनही परिस्थिती जैसे थे होत असल्याने यापुढे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती प्रशांत निकम यांनी दिली.
फोटो : ११ जावेद ०९
सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी सकाळी रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा भाजीपाला व इतर साहित्य जप्त केले. (छाया : जावेद खान)