सातारा : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने अप्रमाणित व जादा दराने कृषी निविष्ठांची विक्री करणाऱ्या १७ दुकानांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये १४ दुकानांचे निलंबन तर ३ केंद्रावर कायमस्वरुपी रद्दची कारवाई करण्यात आली आहे.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खते, बियाणे तसेच विविध पातळीवर तयारी केलेली आहे. तर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्ह्यात १२ भरारी पथकांमार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच कृषी निविष्ठांची जादा दराने विक्री, अप्रमाणित कृषी निविष्ठांची विक्री करणे आदी प्रकार आढळून आल्यास संबंधित केंद्रावर कठोर कायदेशिर कारवाई करण्यात येत आहे. त्यातूनच १४ दुकानांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे. यामध्ये ३ बियाणे विक्रेते, ९ खत आणि २ किटकनाशक विक्रेत्यांचा समावेश आहे. तर २ खत विक्रेते व एका किटकनाशक विक्रेत्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी विभागाने रासायनिक खतांची उपलब्धताही पुरेशा प्रमाणात केली आहे. यामध्ये युरिया १६ हजार ७६४ मेट्रीक टन आहे. डीएपी १० हजार २८७ मेट्रीक टन, म्युरेट ऑफ पोटॅश ९२६ मेट्रीक टन, सुपर फॉस्फेट ९ हजार ३७५ मेट्रीक टन तसेच इतर संयुक्त खते २५ हजार ९२७ मेट्रीक टन उपलब्ध आहेत.जिल्ह्यात बियाणांचा पुरवठाही योग्य प्रमाणात झाला आहे. यामध्ये ज्वारीचे ६८५ क्विंटल उपलब्ध आहे. बाजरी १ हजार ५९५ क्विंटल, भात १० हजार ७४९ क्विंटल, सोयाबीन १४ हजार ९६ क्विंटल, घेवडा २ हजार १७९ क्विंटल, मका ६ हजार ३४७ क्विंटल बियाणे कृषी सेवा केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी करताना विक्रेत्यांकडून पक्की पावती घ्यावी. खताची ऑफलाईन विक्री झाल्याचे आढळून आल्यास संबंधित विक्री केंद्रावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
कृषी निविष्ठांच्या तक्रारींच्या अनुषंगाने प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निविष्ठांबाबत तक्रार असल्यास संबंधित तालुका तक्रार निवारण कक्ष किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी निविष्ठा तक्रार निवारण कक्ष येथे संपर्क साधावा. - विजय माईनकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी