उंब्रज : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कडक लॉकडाऊन जाहीर केला. या आदेशाची अंमलबजावणी करत उंब्रज पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या ७२ मोटारसायकलस्वारांवर कडक कारवाई करत मोटारसायकली जप्त केल्या आहेत. दरम्यान, उंब्रज पोलिसांनी उंब्रजमधील अंतर्गत रस्ते बॅरिकेड्स लावून बंद केले असून मुख्य रस्त्यावर नाकाबंदी केली आहे.
जिल्हा प्रशासनाने यापूर्वी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमधील शिथिलतेचा गैरफायदा घेऊन नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वावर सुरू केला होता. परंतु प्रशासनाने सध्या कडक नियमावली जाहीर केली. त्याचे काटेकोर पालन करण्यासाठी उंब्रज पोलिसांनी ठोस पावले उचलली असून, मंगळवार दुपारपर्यंत विनाकारण फिरणाऱ्या ७२ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या, तर ५१ मोटारसायकलवर मोटर वाहन अंतर्गत दंडात्मक कारवाई करून सुमारे १० हजार २०० रुपये वसूल केले आहेत. तर विनामास्क फिरणाऱ्या जवळपास २१ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे १० हजार ५०० रुपये वसूल केले आहेत. पोलीस प्रशासनाने उंब्रज येथील अंतर्गत रस्ते, सबवे बंद केले आहेत. तसेच मुख्य रस्त्यावर बॅरिकेड्स लावून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नाकाबंदी केली आहे.