रहिमतपूर : कोरोना पुन्हा हातपाय पसरत असताना मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरून इतरांना धोका निर्माण केल्याप्रकरणी ७८ नागरिकांकडून रहिमतपूर पालिकेने ७८०० रुपये दंड वसूल केला आहे.
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे दि. १ फेब्रुवारीपासून आजअखेर नऊ कोरोनाबाधित सापडले आहेत. जिल्हाभर बाधितांची संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तरीही काही नागरिक या आवाहनाकडे दुर्लक्ष करून बेजबाबदारपणे विनामास्क फिरत आहेत. बेजबाबदार नागरिकांना गंभीर परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी पालिका प्रशासनामार्फत गेल्या चार दिवसांपासून कारवाईचा दंडुका उगारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवरच येथील गांधी चौक, रोकडेश्वर मंदिर, एसटी स्टँड परिसरात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रत्येकी शंभर रुपये याप्रमाणे ७८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
नगराध्यक्ष आनंदा कोरे व मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकामध्ये उमेश घाडगे, विनोद दहिफळे, दत्तात्रय राणे, शरद बरडे, अभिषेक कोळेकर आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
२४रहिमतपूर कारवाई
फोटो : रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे मास्क न घालता फिरल्याप्रकरणी पालिकेच्या पथकाकडून नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. (छाया : जयदीप जाधव)