चाफळ : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे कडक लाॅकडाऊन जाहीर केलेले असताना चाफळमधील काही दुकानदार दुकाने सुरू ठेवून मालाची विक्री करीत आहेत. अशा दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एका दुकानावर पोलिसांनी छापा टाकून दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई यापुढे सुरूच राहणार असून, कोणीही नियम मोडून आपली दुकाने सुरू ठेवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
जिल्हात १५ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याला कुठेतरी आळा बसावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या काळात केवळ औषधांची दुकाने व दवाखाने उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. बेकरी, भाजीपाला, किराणा माल व इतर दुकानेदेखील बंद ठेवण्याचा आदेश काढला असताना चाफळमधील काही दुकानदार छुप्या पद्धतीने दुकाने सुरू ठेवून माल विक्री करीत आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे नियम पाळणाऱ्या दुकानदारांवर अन्याय होत आहे, अशा तक्रारी चाफळमधील काही दुकानदारांनी चाफळ पोलिसांकडे केल्या होत्या. पोलिसांनी चाफळ बाजारपेठेत फेरफटका मारला असता चाफळ गावात एक दुकानदार आपले दुकान उघडे ठेवून मालाची विक्री करताना आढळून आला. दुकानमालकावर पोलीस व ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली.
चौकट
चाफळमधील बहुतांश दुकानदार दुकानाचे सेटर बंद ठेवून दरवाजा बाहेर उभे राहून ग्राहकांना माल देत आहेत. त्यामुळे चाफळ विभागातील वाड्या-वस्त्यांवरील लोक चाफळ गावात विनाकारण येऊन गर्दी करीत आहेत. याकडे कोरोना कमिटीने कानाडोळा केला असून लॉकडाऊनच्या नियमांना धाब्यावर बसविणाऱ्या दुकानदारांवर व विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी चाफळ ग्रामस्थांनी केली आहे.