पाचगणी : पर्यटनावर बंदी असताना पाचगणी येथे विनापरवाना दाखल झालेल्या पर्यटकांवर पोलीस व पालिका प्रशासनाने कारवाई करत शहर सोडण्यास सांगितले. मात्र, ज्या हॉटेलने या पर्यटक प्रवाशांसाठी ग्रीन कार्पेट अंथरले त्या हॉटेलवर कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न पाचगणीकर विचारत आहेत.
पाचगणी पर्यटन नगरीत गुरुवारी रात्री विनापरवाना पर्यटक दाखल झाले. त्यांच्या पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर हे पर्यटक हॉटेल दिल्ली दरबारमध्ये गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी पर्यटकांवर पालिकेच्या भरारी पथकाने दंडात्मक कारवाई करून सोडून दिलं. पण ज्या हॉटेलमध्ये संबंधित पर्यटक उतरले होते, त्या हॉटेलवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. हॉटेलला अभय का दिले? पर्यटकांवर अन्याय आणि हॉटेल मालकावर मेहरनजर का, अशा चर्चा आता होत आहेत.
या हॉटेलमध्ये पर्यटक बुकिंग असल्याशिवाय आलेच कसे? म्हणजे याचा अर्थ अगोदर बुकिंग घेतले असावे. पर्यटनबंदी तसेच लॉकडाऊन असताना बुकिंग घेतले असेल तर कारवाई झालीच पाहिजे. मग प्रशासनाने हॉटेलमध्ये पर्यटकांना राहण्यासाठी रूम दिल्याबद्दल कारवाई का केली नाही. ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ म्हणत सर्व कसं आलबेल चालू असल्याचा फील याठिकाणी दिसून येत आहे. पाचगणीमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, पालिका प्रशासन हाॅटेलवर कारवाई करणार का? याकडे लक्ष लागले आहे.
चौकट :
सर्वसामान्य नागरिकांना नातेवाईकांकडे जाण्यास व फिरण्यास बंदी आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये पर्यटकांचा हॉटेलमध्ये मुक्त संचार सुरु आहे. येथे कोरोना नाही का..?