वाई : ‘शासनाच्या धोरणानुसार गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात प्रथम डॉल्बीसाठी आवाजाची मर्यादा आसणार आहे़ मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर व डॉल्बी मालकांवर कायदेशीर कार्यवाही करून दंड आकरण्यात येणार आहे़ डॉल्बी जिल्हा बंदी करण्यासाठी हालचाली सुरू आहेत,’ अशी माहिती पोलिस उपअधीक्षक खंडेराव धरणे यांनी दिली. वाई येथील यात्री निवास व कन्या शाळेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. गणेशोत्सव शांततेत व्हावा, कोणी नियमांचे उल्लघन करू नये, मंडळांना विविध प्रकारच्या सूचना देणे व त्यांची मते जाणून घेण्यासाठी नगरपालिका प्रशासन, पोलिस प्रशासन, सामाजिक संस्था व गणेश मंडळांसाठी ही बैठक झाली. यावेळी प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार अतुल म्हेत्रे, नगराध्यक्षा सीमा नायकवडी, पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, मुख्याधिकारी आशा राऊत, माजी नगराध्यक्ष भूषण गायकवाड, नगसेवक सचिन फरांदे, महेंद्र धनवे, डॉ़ अमर जमदाडे, पद्मा पिसाळ, शर्मिला जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती़ पोलिस उपअधीक्षक धरणे म्हणाले, ‘मंडळांना यावर्षी शासनाकडून शेवटचे पाच दिवस रात्री बारापर्यंत देखावे सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे़ मंडळाच्या मंडपाचा आकार नियमानुसार असावा. आक्षेपार्ह देखावे न दाखविता समाज प्रबोधनाचे देखावे सादर करावेत़ धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी नसणाऱ्या मंडळांना वर्गणी गोळा करता येणार नाही. तशा आशयाची तक्रार आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही होणार आहे. गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. (प्रतिनिधी) समाजाचे प्रबोधन व्हावे, या उद्देशाने राज्य पातळीवर लोकमान्य टिळक गणेशोत्सव अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानात बक्षीस व सन्मानपत्र मिळणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या विषयांची माहिती घेऊन देखावे करून या स्पर्धेत भाग घ्यावा. - अस्मिता मोरे, प्रांताधिकारी डॉल्बीचे अनेक दुष्परिणाम असून, ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते़ शहरातील मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करून गणेशोत्सवाचे पावित्र्य जपावे. शहरातून डॉल्बी हद्दपार करून एक नवा आदर्श घालून द्यावा. - विनायक वेताळ, पोलिस निरीक्षक वाई पावसामुळे कृष्णा नदी स्वच्छ झाली असून, तिची स्वच्छता कायमस्वरूपी राखणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने शाडूच्याच मूर्ती घ्याव्यात़ वाई शहरातील सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे़ - आनंद पटवर्धन, संचालक समूह संस्था
आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई होणार
By admin | Published: August 28, 2016 11:57 PM