कोरेगाव : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायत निवडणुकांत राष्ट्रवादी कॉंग्रेससह महाविकास आघाडीला यश मिळाले. उत्तर भागामध्ये राष्ट्रवादीने गड राखला असला तरी देऊरमध्ये मात्र सत्तांतर झाले आहे. दक्षिणेमध्ये तीच परिस्थिती असून, वाठार (किरोली) मध्ये सत्तांतर झाले आहे. मध्य भागात आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी बहुतांश ग्रामपंचायती आपल्याच पॅनलने जिंकल्या असल्याचा दावा केला आहे. ल्हासुर्णे, पाडळी स्टेशन (सातारा रोड), कठापूर, मंगळापूर व तांदूळवाडी या मोठ्या ग्रामपंचायतींवर आमदार महेश शिंदे यांच्या गटाने सत्ता मिळवली आहे.
कोरेगाव तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता,
त्यापैकी नागेवाडी, चिलेवाडी, तडवळे संमत वाघोली, कोलवडी, होलेवाडी, भिवडी व बोधेवाडी (चिमणगाव) या ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या, तर १२ ग्रामपंचायतींची अंशत: निवडणूक बिनविरोध झाली होती. ४९ गावांमध्ये ३४४ जागांसाठी ६८७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. दुरंगी लढत असल्याने शांततेत ८१.९२ टक्के मतदान झाले होते.
सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. तीन फेऱ्यांवर मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दहीगाव येथील मतमोजणीच्या वेळी मतमोजणी प्रतिनिधींना हजर राहण्यासाठी ध्वनीक्षेपकावरून उद्घोषणा करून बोलविण्यात आले, मात्र एका पॅनलचे प्रतिनिधी आले नाहीत. तद्नंतर अर्ध्या तासाने ते प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात दाखल झाले आणि त्यांनी प्रशासकीय यंत्रणेबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. अखेर पुन्हा त्यांच्यासमक्ष मतमोजणी करण्यात आली. अंबवडे संमत वाघोली येथे आमदार महेश शिंदे यांच्या गटाला ४ तर आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाला ४ जागा मिळाल्या. पाचव्या जागेवर २२६ अशी सम-समान मते पडल्याने कु. नंदिनी नलवडे या १३ वर्षीय लहान मुलीकडून चिठ्ठी काढण्यात आली, त्यात आमदार महेश शिंदे गटाच्या उमेदवाराची चिठ्ठी निघाल्याने ती ग्रामपंचायत त्यांच्या गटाकडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. दक्षिण भागातील सर्वात मोठ्या वाठार (किरोली) ग्रामपंचायतीमध्ये तब्बल दहा वर्षांनंतर सत्तांतर झाले असून, कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने दहा जागा मिळवत सत्ता हस्तगत
केली आहे. वाठार स्टेशनमध्ये राष्ट्रवादीने सत्ता कायम ठेवली असून, उत्तर भागात बहुतांश ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत. देऊरमध्येदेखील सत्तापरिवर्तन झाले आहे. आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणूक १९ ग्रामपंचायतींमध्ये यश संपादन केले आहे. किन्हई, अरबवाडी, कोलवडी, चिलेवाडी, जांब बुद्रुक, त्रिपुटी, तांबी, दुघी, दुधनवाडी,शेंदूरजणे, नागेवाडी, निगडी, भक्तवडी, भाकरवाडी, भिवडी, भोसे, भंडारमाची, मध्वापूरवाडी आणि बिचुकले या गावांमध्ये राष्ट्रवादीने यश संपादन केले आहे. आमदार महेश शिंदे यांचे नेतृत्व मानणाऱ्या गटाने ल्हासुर्णे ग्रामपंचायतीमध्ये निर्विवाद सत्ता मिळवली आहे. तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींवर त्यांनी वर्चस्व मिळवले असल्याचा दावा केला आहे. ल्हासुर्णेसह तांदूळवाडी, मंगळापूर, कठापूर, गोडसेवाडी, पेठ किन्हई, नलवडेवाडी (बिचुकले), देऊर, पाडळी स्टेशन (सातारारोड), अंबवडे संमत वाघोली, रेवडी, बोरजाईवाडी या गावांचा त्यात समावेश आहे. बिनविरोध झालेल्या गोगावलेवाडी, भिवडी, नागेवाडी, कोलवडी, होलेवाडी, चिलेवाडी ग्रामपंचायतींवर दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांनी दावा केला आहे.
७७ पैकी ४८ गावांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व : अरुण माने
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव, सातारा व खटाव तालुक्यातील एकूण ७७ पैकी ४८ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यश मिळवले असून, महाविकास आघाडी पॅटर्नद्वारे सहा ग्रामपंचायतींवर सत्ता आली असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अरुण माने यांनी एका पत्रकाद्वारे नमूद केले आहे.
फोटो ओळ : ल्हासुर्णे ग्रामपंचायत निवडणुकीत विजय खेचून आणल्यानंतर कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे यांना खांद्यावर घेत आनंदोत्सव साजरा केला.
फोटो ओळ : पाडळी स्टेशन ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर घडवून आणल्यानंतर कार्यकर्त्यांसमवेत आनंदोत्सव साजरा करताना आमदार महेश शिंदे व किशोर फाळके.