सागर गुजर ।सातारा : सध्याच्या राजकीय परिस्थितीत जिल्ह्याला किमान चार मंत्रिपदे मिळतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. वाईचे आमदार मकरंद पाटील, क-हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आणि पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा आहे. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव झाल्याशिवाय जिल्ह्याच्या मंत्रिपदाचे स्वप्न सत्यात उतरणार नाही. विश्वासदर्शक ठराव कधी होतोय? याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या आहेत.
भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले असते तर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाले असते. मात्र सत्तास्थापनेच्या काळात राज्याच्या राजकारणाने अनेक हेलकावे खाल्ले. भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागले, त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आ. जयकुमार गोरे यांचे स्वप्न भंगले. मात्र शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँगे्रस यांच्या मदतीने सत्ता स्थापन केल्याने आ. शंभूराज देसाई यांना निश्चितपणे मंत्रिपद मिळेल, अशी कार्यकर्त्यांना आशा आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँगे्रस हे दोन्ही पक्ष आता सत्तेत सहभागी झाले आहेत. विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर भर पावसात खासदार शरद पवार यांची भव्य सभा झाली अन् या सभेने निवडणुकीतील रंगच बदलून गेले. संपूर्ण महाराष्ट्रभर या सभेचे पडसाद उमटले आणि राष्ट्रवादी आणि काँगे्रस या दोन्ही पक्षांच्या आमदारांच्या संख्येने मोठी वाढ झाली. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे ४१ आमदार होते, तेच आता ५४ झाले. तर काँग्रेसच्या आमदारांची संख्या ४२ वरून ४४ वर पोहोचली.
जिल्ह्यात आठपैकी ४ जागा राष्ट्रवादी आणि काँगे्रस या दोन्ही पक्षांनी पटकावल्या. बालेकिल्ल्यातील जनतेने राष्ट्रवादीला साथ दिली. त्याचबरोबर पवारांचे हात बळकट केले. त्यामुळे साताºयाचा यथोचित सन्मान करण्याचा निर्धार पवारांनी केला. क-हाडातील कार्यक्रमात त्यांनी आ. बाळासाहेब पाटील यांना मतदारसंघापुरते न ठेवता राज्याच्या सत्तेत नेणार असल्याचे स्पष्ट केले. तर राष्ट्रवादी-काँगे्रस आघाडीची सत्ता येण्याची धूसर कल्पना नसतानाही आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील आणि आ. दीपक चव्हाण हे तिघेजण राष्ट्रवादीत पाय रोवून राहिले. साहजिकच, या आमदारांविषयी पवारांना आत्मीयता आणि जिव्हाळा आहे.
त्यांचा योग्य तो सन्मान करण्याचा निर्णय पवार घेतील. मात्र, हा सन्मान कधी होतोय आणि सातारा जिल्ह्यातील विकासकामे कधी पूर्ण होतात? याचीच उत्सुकता सातारा जिल्ह्यातील जनतेला लागू राहिलेली आहे.
- बाबांच्या नावाची केवळ घोषणाच बाकी
माजी मुख्यमंत्री आणि काँगे्रसचे अभ्यासू नेते पृथ्वीराज चव्हाण हे कºहाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी कºहाड जिल्हा करण्याच्या हालचाली केल्या होत्या. जिल्ह्याच्या अनुषंगाने लागणारी प्रशासकीय इमारत, भूकंप संशोधन केंद्र, पोलिसांची आधुनिक वसाहत त्यांनी कºहाडात उभारली होती. कºहाड जिल्ह्याची जणू घोषणाच बाकी होती. आता पृथ्वीराज चव्हाण यांना राज्याच्या सत्तेत महत्त्वाचे पद मिळणार, याची खात्री असल्याने क-हाडकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांना मानाचे पद मिळणार असून, त्याची घोषणा ऐकण्याकडे क-हाडकरांचे कान लागले आहेत.