औंध : ‘ग्रामपंचायत, सोसायट्या या स्थानिक पातळीवरील निवडणुका असतात. या निवडणुकीमुळे कमी - जास्त प्रमाणात गावोगावी मतभेद होतात. या मतभेदाचे रुपांतर मनभेदात न करता प्रमुख कार्यकर्त्यांनी विकासकामे करावीत,’ असा सल्ला पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिला.
खटाव तालुक्यातील अंबवडे येथील विकास सेवा सोसायटीच्या अद्ययावत इमारतीच्या लोकार्पण व नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खरेदी - विक्री संघाच्या संचालिका इंदिरा घार्गे, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी सभापती संदीप मांडवे, जितेंद्र पवार, नंदकुमार मोरे, सहाय्यक निबंधक विजया बाबर, प्रकाश नलवडे, सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय पवार, उपाध्यक्ष बाळासाहेब पवार, सरपंच वैशाली पवार, उपसरपंच सचिन पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, ‘सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून अंबवडे गावाला आपला जुना ऋणानुबंध आहे. ऊस व इतर बागायती शेतीमुळे विकास सोसायटीला चांगली भरभराट आली आहे. गेल्या काही वर्षांत पदाधिकाऱ्यांनीही आदर्शवत काम करून संस्थेचा नावलौकिक जिल्हाभर वाढविला आहे. या गावचे रस्ते, खंडोबा समाज मंदिर तसेच वाढीव क्षमतेने वीजपुरवठा करण्यासंदर्भात जाणीवपूर्वक प्रयत्न केला जाईल.’
यावेळी संदीप मांडवे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र पवार, ॲड. रोहन जाधव, आशा बरकडे, माजी सरपंच महादेव पवार, संभाजी पवार, अंकुश पवार, विजय पवार, नितीन जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, पोपट वाघ, सुनील नेटके, श्रीकांत धर्माधिकारी, गोरख पवार, शिवाजी घाडगे, सुखदेव पवार, देविदास पवार, शिवाजी नलवडे, ज्ञानेश्वर इंगवले, व्ही. एस. पवार, सयाजी बुधे, राजेंद्र खटावकर आदींसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. अध्यक्ष दत्ता पवार यांनी स्वागत केले. शांताराम पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. लक्ष्मण पवार यांनी आभार मानले.
२०औंध
फोटो- अंबवडे येथील सोसायटीच्या लोकार्पणप्रसंगी मंत्री बाळासाहेब पाटील समवेत इंदिरा घार्गे व मान्यवर उपस्थित होते. (छाया : रशीद शेख)