आदर्की : फलटण पश्चिम भागातील कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी संस्थानात ब्रिटिश राजवटीत व देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आदर्की येथे पोलीस चौकी आहे. आता वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी, वाढत्या कारखानदारीचा विचार करून आदर्की पोलीस चौकी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला जोडण्याची मागणी होत आहे.
फलटण संस्थान काळात आदर्की खुर्द (दसतुरी ) येथे तपासणी नाका होता. त्याचठिकाणी ब्रिटिशकालीन पोलीस चौकीची इमारत होऊन तेथे ब्रिटिश पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी कामकाज पाहत असत. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोणंद पोलीस स्टेशनअंतर्गत आदर्की बुद्रुक येथे दूरक्षेत्र पोलीस चौकीची स्थापना करून फलटण पश्चिम तालुक्यातील आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, कापशी, आळजापूर, बिबी, कोराळे, घाडगेवाडी, सासवड, टाकोबाईचीवाडी, हिंगणगाव, शेरेचीवाडी (हिंगणगाव) सालपे, मुळीकवाडी गावांत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम दोन कर्मचारी संस्थानकालीन इमारतीमधून पाहत होते. चाळीस वर्षांपूर्वी आदर्की बुद्रुक येथे पोलीस चौकी व पोलीस वसाहतीची इमारत बांधण्यात आली व तेथून कामकाज सुरू झाले.
आदर्की दूरक्षेत्र पोलीस चौकीच्या हद्दीत सालपे व हणमंतवाडी घाट, मिरगाव खिंड, नाना घोल येथे लूटमारी, वाटमारी वारंवार होत असते, तर अपघातही या ठिकाणी होत असतात. त्याप्रमाणे एक साखर कारखाना, डिस्टिलरी, चार दूध डेअऱ्या, त्याचबरोबर छोटे दहा-बारा लघु उद्योग आहेत. वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी, अपघात समोर ठेवून आदर्की दूरक्षेत्र पोलीस चौकी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला जोडण्याची मागणी होत आहे.
(चौकट)
अनेकवेळा मृतदेहांची हेळसांड...
आदर्की परिसरात तक्रार, अपघात, आत्महत्या, खून आदी कायदा सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण झाल्यास फिर्याद देण्यासाठी लोणंद पोलीस स्टेशनला जावे लागते, तर एखाद्याने आत्महत्या केल्यास त्याचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी लोणंद प्राथमिक केंद्रात नेले जाते. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्यास मृतदेह नातेवाइकांना फलटण ग्रामीण रुग्णालयात न्यावा लागतो. त्यामुळे मृतदेहाची अनेकवेळा हेळसांड होते. लोणंदला जाण्यासाठी गाडी नाही. त्यामुळे स्पेशल गाडी करून पोलीस स्टेशनला जावे लागते.
कोट..
आदर्की परिसरातील सर्व गावे लोणंद पोलीस स्टेशनला जोडली आहेत. या गावात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आदर्की दूरक्षेत्र पोलीस चौकी आहे. पण कर्मचारी संख्यI कमी आहे. त्यामुळे तक्रार देण्यासाठी लोणंदला जावे लागते, तर न्यायालय फलटणला आहे. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांना आदर्की दूरक्षेत्रला स्वतंत्र पोलीस चौकीचा दर्जा द्यावा किंवा फलटण ग्रामीण पोलीस चौकीला जोडण्याची मागणी करणार आहे.
- हणमंत बासर,
उपाध्यक्ष, सातारा जिल्हा शिवसेना ग्राहक, संरक्षण समिती
28आदर्की
फोटो आहे..