आदर्की : फलटण पश्चिम तालुक्यातील आदर्की, बिबी, हिंगणगाव, सासवड, घाडगेवाडी, मुळीकवाडी, कापशी, आळजापूर, कोऱ्हाळे, वडगाव, वाघोशी आदी गावांमध्ये मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणच्या मंदिरात महिलांनी एकत्र येत हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करतानाच तिळगुळाचे वाटपही केले.
निबंध, वक्तृत्व स्पर्धा
मायणी : नवमहाराष्ट्र विद्यालय, चितळी (ता. खटाव) येथे निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वक्तृत्व स्पर्धा आॅनलाइन होणार असून, विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणाचा व्हिडीओ सादर करावयाचा आहे. तर निबंध व चित्र घरूनच काढून आणावयाची आहेत. पाचवी ते सातवी लहान व आठवी ते दहावी मोठा अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे.
रस्ता डांबरीकरणाला प्रारंभ
सातारा : सातारा शहरातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण केल्यानंतर आता सातारा पालिकेने अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. सध्या पोवई नाका परिसर, रविवार पेठ, चुना भट्टी या परिसरातील रस्ता डांबरकीरणाचे काम प्रगतीपथावर आहे. खड्ड्यांमुळे अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. डांबरीकरणामुळे वाहनचालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
रिफ्लेक्टरची मागणी
सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर लहान-मोठे अपघात होत आहेत. सध्या महामार्गावरून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने वाढे फाटा ते लिंबखिंड या परिसरात दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर बसवावेत, अशी मागणी होत आहे.
पारा १५ अंशांवर
महाबळेश्वर : सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचा पारा शुक्रवारी १५ अंशांवर स्थिरावला. हवामान विभागाने महाबळेश्वरचे कमाल तापमान ३१.६ तर किमान तापमान १५.९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीची तीव्रता ओसरली असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी व रविवारी महाबळेश्वर, पाचगणी ही पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने गजबजून जात आहेत.
झुुडपे हटविण्याची मागणी
शाहूपुरी : येथील कोटेश्वर ते शाहूपुरी या मार्गावर रस्त्याकडेला दुतर्फा झुडपे वाढली आहेत. या झुडपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी या झुडपांचा वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. झुडपे तोडण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ही झुडपे जैसे थे आहेत.
स्वच्छतागृहाची गरज
परळी : सज्जनगडावर भाविकांची सतत वर्दळ असते. मात्र, येथील बसस्थानकात शौचालय नसल्याने भाविकांची गैरसोय होते. त्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेत तीर्थक्षेत्राचे पावित्र्य जपण्यासाठी याठिकाणी शौचालय बांधावे, अशी मागणी नागरिक तसेच वाहनचालकांमधून होत आहे.
भूजल पातळी खालावली
मेढा : जावळी तालुक्यातील सुमारे चाळीस गावांमध्ये विहिरींच्या पाणी पातळीत हळूहळू घट होऊ लागली आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने त्याचा भूजल पातळीवर मोठा परिणाम झाला आहे. अवकाळी पावसाने पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, उन्हाळ्याची चाहुल लागताच पाणी पातळीही खालावू लागली आहे.
स्वच्छतेची मागणी
सातारा : येथील महात्मा फुले भाजी मंडई व मार्केट यार्ड परिसरात काही ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. याठिकाणी दुर्गंधी पसरल्याने व्यावसायिक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे मंडई परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.