लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सीए अभ्यासक्रमाच्या निकालाचा टक्का अगदीच कमी आहे, हे मान्य पण एकदाच स्वत:ला बजवायचं दुनियेला जमतंय मग आपल्याला का नाही? स्वप्नाला जिद्दीचे पंख लावले की आकाशी भरारी अगदी ठरलेली... पहिल्या प्रयत्नात सीए झालेली माधुरी राजेंद्र माळी सांगत होती आपल्या यशाचं गमक!
प्रश्न : सीए व्हावंस का वाटलं?
उत्तर : माझे वडील वाणिज्य शाखेतील पदवीधर. त्यांची परिस्थिती नसल्याने त्यांना शिकता आले नाही. मी सीए व्हावं अशी इच्छा त्यांनी एकदाच मला बोलून दाखवली आणि तेच माझं स्वप्न बनलं. वडिलांनी दाखविलेल्या मार्गावर जाताना हे आपल्याला साध्य करायचं आहे इतकंच माझ्या डोक्यात होते.
प्रश्न : सीएचा अभ्यास कसा केलास?
उत्तर : सीए व्हायचं असेल तर मोठ्या शहरात जाऊन खासगी क्लास करून मगच यश मिळवते येते हे चुकीचे आहे. दहावीपर्यंत कल्याणी त्यांनी डीजी कॉलेज आणि प्रा. विश्रांत कदम यांच्या मार्गदर्शनामुळे मला हे यश मिळविता आले. मोठ्या शहरात गेल्यावरच ही परीक्षा उत्तीर्ण होता येते हा निव्वळ गैरसमज आहे. काही विद्यार्थी तर केवळ ऑनलाइन अभ्यास करूनही उत्तीर्ण होतात.
प्रश्न : यश मिळविल्यानंतर आता पुढे काय?
उत्तर : वृत्तपत्र विक्रेते असणारे वडील राजेंद्र आणि त्यांना कायम साथ देणारी माझी आई कल्पना. आम्ही अगदीच सामान्य कुटुंबातील आहोत. जिद्दीच्या जोरावर हे यश मी खेचून आणलं. माझ्या यशाचं कौतुक कुटुंबीयांबरोबरच परिचितांनाही झाला. आपल्यामुळे लोकांचे चेहरे खुलले यात समाधान मोठे आहे. त्यामुळे भविष्यात सामान्य कुटुंबातील मुलांना सीए परीक्षेसाठी आवश्यक ती माहिती पुरविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
शंका.. काळजी आणि यश!
सीए करायचं ठरवलं तेव्हाच अनेकांनी, ‘बघ बाई झेपेल का तुला’ असा सूर लावला होता. कुटुंबाचा पाठिंबा आणि त्याला शिक्षकांची जोड यामुळे मी उत्तीर्ण होईन, असे वाटायचे. पण, देशपातळीवरील निकाल पाहिल्यावर मनात शंका यायची. आपण नापास झालो तर याची काळज़ी वाटायची. पण माझा निकाल लागल्यानंतर अपार कष्टाचे परिणाम यश असते हे उमगले. मी उत्तीर्ण झाले याहीपेक्षा आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि अभिमानाचे भाव मला पुढील वाटचालीत मार्गदर्शक ठरतील, असेही माधुरीने सांगितले.
.................