मलकापूर : कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याचे रूंदीकरण शंभर फुटाने झाल्यास नवीन भूसंपादनात चचेगावातील शेतकऱ्यांची रस्त्याकडेची ५२ गटातील प्रत्येकी दहा फूट जमीन जाणार आहे. त्याचबरोबर अडीच किलोमीटर परिसरातील अनेक घरांनाही झळ पोहोचणार आहे. शासन शंभर फुटावर ठाम राहिल्यास शेतकऱ्यांमधून उद्रेक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याचे शंभर फुटाने रूंदीकरण सुरू आहे. महिला उद्योग ते टाकेवस्ती या एक किलोमीटर अंतरात कंत्राटदाराच्या वतीने रस्त्याच्या दक्षिणेस पन्नास फुटाने जमीन कापली गेली आहे. अडीच किलोमीटर परिसरातील चचेगावच्या शेतकऱ्यांची ५२ गटातील जमीन संपादित करावी लागणार आहे. तसे झाल्यास ५२ गटातील सुमारे पाच एकरापेक्षा जास्त जमीन संपादित होणार आहे. सध्याचे रस्त्याकडेच्या जमिनीचे दर विचारात घेता बाजारभावाप्रमाणे कोट्यवधीची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. शासनाने त्या जमिनीला रेडी रेकनरप्रमाणे दर दिल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या रस्त्याच्या दुतर्फा चचेगावच्या हद्दीत दिवसेंदिवस घरांची संख्या वाढत आहे. घोरपडे वस्ती, टाकेवस्ती, मुल्ला वस्तीसह चचेगाव एस. टी. स्टॅन्ड परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे. रूंदीकरण झाल्यास पन्नासपेक्षा जास्त घरांना झळ पोहोचणार आहे. काही कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे शंभर फुटाने रूंदीकरण करू नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. (प्रतिनिधी)
शेतीबरोबरच घरांनाही बसणार फटका
By admin | Published: February 03, 2015 11:24 PM