पावसाची संततधार : ओढे, नद्या, नाले तुडूंब
कोयनानगर : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह परिसरात सलग चार पाच दिवस पडत असलेल्या संततधार पावसाने ओढे, नद्या, नाले भरून वाहू लागले आहेत. धरणाच्या पाणीसाठ्यातही चार दिवसांत चार टीएमसीने वाढ झाली आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळी आठ वाजता धरणात ४६.०३ टीएमसी पाणीसाठा होता. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे.
कोयना भागात १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने सुरुवात केल्यामुळे रखडलेल्या भात आणि नाचणी लावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या आकडेवारीनुसार कोयना धरणातील पाणीपातळी २१०२.०८ फूट एवढी होती; तर पाणीसाठा ४६.०३ टीएमसी झाला आहे. पाण्याची आवक १६ हजार ८७४ क्युसेकने सुरू आहे. २९ जूनपासून पूर्वेकडील पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग पूर्ण बंद आहे. गत २४ तासांत पाणलोट क्षेत्रात कोयना येथे ५२ मि.मी., नवजा ९९ मि.मी., महाबळेश्वर ५७ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. नवजा येथील पर्जन्यमापकावर आजअखेर एकूण दीड हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरने यापूर्वीच हा टप्पा पूर्ण केला आहे.