सातारा : आरटीई प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने ही यंत्रणा वापरताना पालकांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे ही बाब शिक्षण विभागाच्या लक्षात आणून दिल्यानंतर प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शाळा प्रवेशासाठी बालकांना पुरेसा कालावधी दिला जाईल असे आश्वासित केले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ऑनलाइन सोडत बुधवार दिनांक ५ एप्रिल रोजी काढण्यात आली. ज्या बालकांची निवड यादी मध्ये प्रवेशासाठी निवड झाली आहे, त्या बालकांच्या पालकांनी १३ ते २५ एप्रिल या कालावधीत पंचायत समिती, नगरपालिका स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून घेऊन प्रवेश निश्चित करण्याबाबत पूर्वी निर्देश देण्यात आले होते.