फलटण : कोरोनाबाधित रुग्णांकडून भरमसाट बिले आकारणाऱ्या फलटण शहरातील तीन खासगी रुग्णालयांना प्रशासनाने दणका दिला. या वेळी आकारलेली जास्तीची बिले परत करण्याचा आदेश दिला आहे. १०० जणांकडून घेतलेले जास्तीचे तीन लाख ४३ हजार ६०० रुपये रुग्णांना परत मिळणार आहेत.
कोरोना रुग्णांकडून जास्तीचे पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयांसाठी ऑडिटर्स नेमले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या या समितीमुळे फलटण शहरातील निकोप, लाइफ लाइन आणि सिद्धिविनायक या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या १०० जणांकडून जास्तीचे घेतलेले ३,४३,६५० रुपये परत केले आहेत.
कोरोनामुळे फलटण तालुक्यातील हजारो लोक बाधित झाले होते. त्यापैकी ऑक्सिजनची लेव्हल कमी झालेली आणि व्हेंटिलेटरची गरज पडली, अशा रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. फलटणमधील सरकारी तसेच नऊ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. यापैकी काही रुग्णालयांनी वाढीव बिले लावल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा ज्यादा दर लावून रुग्णालयाच्या वतीने लूट सुरू होती.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीकडे तक्रारी प्राप्त होत्या. या तक्रारींची शहानिशा तज्ज्ञ ऑडिटरच्या माध्यमातून सुरू करण्यात आली. फलटण शहरातील मोठ्या अशा निकोप, लाइफ लाइन आणि सिद्धिविनायक या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या १०० जणांकडून ३,४३,६५० रुपये रुग्णालयांनी जादा आकारल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. या रुग्णालयांना प्रांताधिकाऱ्यांतर्फे नोटिसा देण्यात आल्या. रुग्णांचे बिल कमी करावे, अथवा ज्यांच्याकडून बिले अधिक घेतली आहेत, त्यांची बिले तत्काळ त्यांना परत करावीत, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार संबंधित रुग्णालयांनी पैसे परत करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
(कोट)
आतापर्यंत ९६४ देयके तपासण्यात आली असून, पुढील देयके तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. विम्याची देयके वगळता इतर देयके तपासणी करण्यात येत आहेत. जादा रक्कम परत करण्यासाठी तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे. देयकांची माहिती प्रांत कार्यालयात उपलब्ध आहे. रुग्ण वा जवळचे नातेवाईक यांना पाहण्यास उपलब्ध करून दिली जाईल.
- डॉ. शिवाजीराव जगताप, प्रांताधिकारी