दरम्यान, तालुक्यातील संवेदनशील गावांमध्ये मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतींसाठी तब्बल एक हजार ६६२ उमेदवार रिंगणात आहेत. अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पाल, कार्वे, वहागाव, बेलवडे बुद्रुक, कोपर्डे हवेली, हजारमाची, सैदापूर, काले या मोठ्या ग्रामपंचायतींकडे तालुक्यातील जनतेचे प्रामुख्याने लक्ष लागून राहिले आहे. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून तालुक्यातील ३४५ मतदान केंद्रांवरील यंत्रे व त्यासाठी एक हजार ७२५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन गुरुवारी स्कूल बस, ट्रॅव्हलर बसमधून केंद्रांवर पाठवण्यात आली. तत्पूर्वी शासकीय गोदामात मतदान यंत्रे, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासमोर मतपत्रिकानिहाय सील करण्यात आल्या आहेत. दि. १८ रोजी कऱ्हाडच्या शासकीय गोदामात मतमोजणी होणार आहे. मतदान साहित्य मतदान केंद्रावर पोहोच करण्यासाठी व परत आणण्यासाठी स्कूल बस, ट्रॅव्हलर बस, जीपची सोय करण्यात आली आहे. सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करावे व निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे.
- चौकट :
बिघाड झाल्यास त्वरित मतदान यंत्र उपलब्ध
मतदान यंत्रावरील मतदानाची प्रक्रिया राबविताना अनेक तांत्रिक कारणांमुळे यंत्रामध्ये बिघाड होऊन यंत्रे बंद पडतात. त्यामुळे मतदानाचा वेळ वाया जातो. त्यावेळी मतदान यंत्रे तत्काळ संबंधित गावात उपलब्ध व्हावीत, यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडेही ती देण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित गावात तत्काळ यंत्रे पोहोचवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.