आॅनलाईन लोकमतसातारा , दि. २२ : जिल्ह्यामध्ये दि. १ ते १५ आॅगस्ट या कालावधीमध्ये विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात यावा. याविषयी जनजागृती करण्यात यावी व ग्रामपातळीवर कार्यरत अशा व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिल्या.
जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक जिल्हाधिकारी सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली झाली. या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी जे. एस. शेख, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, शंतनू पाटील, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी डॉ. विकास पाटील, डॉ. घोरपडे, आयएमए व आयएपी प्रतिनिधी उपस्थित होते.
सिंघल यांनी या उपक्रमाअंतर्गत दि. २३ ते २९ जुलै या कालावधीत सातारा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ग्रामसभा व गाव महिला सभांचे आयोजन करण्यात येऊन, त्यामध्ये आरोग्य विभागामार्फत स्टॅण्डर्ड ट्रिटमेंट प्रोटोकॉलनुसार क्षारसंजीवनी, झिंक व पावसाळ्यातील आजारांवर (अतिसार, स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकुनगुण्या) चर्चा करून आरोग्य अधिकारी यांनी मार्गदशन करण्याच्या सूचना केल्या. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयांमध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा आयोजित करून क्षारसंजीवनी, झिंक गोळ्या, स्वच्छता व हात धुण्याच्या प्रकाराबाबत प्रात्यक्षिक घेऊन मार्गदर्शन करण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
२ लाख ४९ हजार लाभार्थ्यांची नोंद
या पंधरवड्यासाठी सातारा जिल्ह्यात ० ते ५ वयोगटांतील एकूण २ लाख ४९ हजार लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. एकूण १५४ क्षारसंजीवनी कॉर्नरची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच घरोघरी वाटप करण्याकरिता क्षासंजीवनीचे एकूण २ लाख ९४ हजार तर झिंकच्या ७३ हजार ५२६ गोळ्यांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे.
३६ शालेय आरोग्य पथके
अतिसार नियंत्रण पंधरवडा यशस्वी करण्यासाठी ३६ शालेय आरोग्य पथके, २ हजार ६६७ आशा, ४२७ आरोग्य सेविका व ४ हजार ७६४ अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिसार नियंत्रण पंधरवडा सर्व सातारा जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील कोणताच भाग यामध्ये वंचित राहणार नाही याची दक्षता घेत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी यावेळी दिली.