कऱ्हाड : रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सातारासह सांगली जिल्ह्यातील ४८ हजारांहून जास्त सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी सोमवारी कऱ्हाडातील निवडणूक कार्यालयातून मतपेट्या मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आल्या आहेत.
कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र पाच तालुक्यांत असून, निवडणुकीसाठी १४८ मतदान केंद्रे आहेत. एका मतदान केंद्रांवर २७० ते ३०० मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर नऊ कर्मचारी राहणार असून एक पोलीस नियुक्त करण्यात आला आहे. सहा गटांच्या सहा व राखीव गटाच्या चार अशा एकूण दहा मतपत्रिका आहेत. २१ शिक्के मारायचे आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निरीक्षक म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. कार्यक्षेत्रातील २२ गावे संवेदनशील असून, त्यातील १५ गावे कऱ्हाड तालुक्यात तर ८ गावे वाळवा तालुक्यात आहेत. मतदानासाठी मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, २ जुलै रोजी मतमोजणी पार पडणार आहे. त्यासाठी तब्बल ३५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ७४ टेबलवर मतमोजणी केली जाणार असून, उमेदवारांच्या प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यात आली आहेत.
- चौकट
... ही गावे संवेदनशील
कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक, वडगाव हवेली, कोडोली, बेलवडे बुद्रुक, काले, आटके, कार्वे, वाठार, विंग, पोतले, शेणोली, उंडाळे, कोळेवाडी, घारेवाडी, धोंडेवाडी तर वाळवा तालुक्यातील नेर्ले, पेठ, बोरगाव, रेठरे हरणाक्ष, किल्ले मच्छिंद्रगड, कामेरी, लवणमाची आदी गावे संवदेनशील आहेत. त्या ठिकाणी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे.
फोटो : २८केआरडी०४
कॅप्शन : कऱ्हाड येथील निवडणूक कार्यालयातून सोमवारी मतपेट्या मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आल्या. (छाया : अरमान मुल्ला)