सातारा : साताऱ्यात सुरू असलेल्या जंबो कोरोना सेंटरबद्दल तक्रारी वाढल्या होत्या. यामुळे जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन काही निर्णय घेण्यात आले. यामध्ये जंबो सेंटरमधील प्रवेश हा पारदर्शी करण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर रुग्ण दाखल होईपर्यंत एकाच नातेवाइकाला त्याच्यासोबत राहता येणार आहे. इतरांसाठी प्रवेश बंद असणार आहे.
सातारा येथे मध्यवर्ती बसस्थानकाजवळ जंबो कोरोना सेंटर सुरू करण्यात आले आहे. अत्याधुनिक पद्धतीचे हे सेंटर आहे. या ठिकाणी रुग्णांना ठेवण्यात येते. बहुतांशी रुग्ण हे जंबोमध्ये दाखल होण्यासाठी प्रयत्नशील असतात; पण या सेंटरबद्दल तक्रारी येत होत्या. ऑनलाइन प्रवेशाबाबत नाराजी होती. यामुळे जिल्हा परिषदेत बैठक झाली. अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, कृषी समिती सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील आदी उपस्थित होते.
या बैठकीत जंबो कोरोना सेंटरमधील प्रवेश पारदर्शक करण्यासाठी विचार करण्यात आला. त्यामध्ये रुग्णाची स्थिती पाहून त्याला जंबो सेंटर का अन्य ठिकाणी उपचारासाठी दाखल करावे याची खात्री करणे, ऑनलाइन प्रवेश सुरळीत करणे यावर चर्चा होऊन काही निर्णय घेण्यात आले. तसेच काही नागरिक विनाकारण आत येत असतात. अशांना पायबंद घालण्यासाठी रुग्णासोबत एकच नातेवाईक प्रवेश होईपर्यंत बरोबर राहील, असेही ठरविण्यात आले, तसेच प्रसंगी सुरक्षा रक्षकांची मदत घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.
चौकट :
हेल्पलाइन नंबर बंद...
जंबो कोरोना सेंटरमध्ये तीन हेल्पलाइन नंबर आहेत; पण तीनही बंद स्थितीत असल्याची माहिती मिळत आहे. बिल न भरल्यानेच ही स्थिती झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा झाली.
फोटो दि.११सातारा झेडपी बैठक नावाने...
फोटो ओळ : सातारा येथे जिल्हा परिषदेत जंबो कोरोना सेंटरबाबत बैठक झाली. यावेळी अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते आदी उपस्थित होते.
.................................