तरडगाव : गृह विलगिकरणात असणारे कोरोना बाधित योग्य काळजी घेत नसल्याने त्यातून आजूबाजूला बाधित रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे अशा रुग्णांना घरी थांबू न देता कार्यकर्त्यांनी भले वाईटपणा स्वीकारून त्यांना वेळीच इतर मोठ्या विलगिकरण कक्षात दाखल करावे, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.फलटण तालुक्यातील तरडगाव येथील चांदोबाचा लिंबजवळील हिंदवी पॅलेसमध्ये उभारण्यात आलेल्या १०१ बेडच्या कोरोना विलगिकरण कक्षाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते या कक्षाचे उदघाटन झाले. यावेळी आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते.रामराजे म्हणाले, ग्रामीण भागात सध्या रुग्णाचे प्रमाण जास्त आहे. यासाठी तालुका पातळीवर संजीवराजे हे तलाठी, ग्रामसेवक आदी पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठका घेत आहेत. तरी लोक ऐकत नाहीत. ही मोठी वाईट परिस्थती आहे. आम्ही औषध व ऑक्सिजन आणतोय. बंद पडलेली कंपनी सुरू केली. ऑक्सिजन प्लांट दिले आहेत.
कार्यकर्त्यानो वाईटपणा आला तरी आपलं काम सुरू ठेवा. शासन हे आपल्या परीने काम करीत आहे. अनेक ठिकाणी मोठी विलगिकरण कक्ष आहेत. काही गावातील शाळांमध्ये असे कक्ष तयार केले आहेत. तरी रुग्ण यामध्ये येतच नाहीत. तालुक्याच्या भल्यासाठी कटुता आली तरी येऊ द्या, राजकीय परिणामाची वेळ आली तरी होऊ द्या. मात्र तालुक्याचा विचार हा आपल्यालाच करावा लागणार आहे.यावेळी पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर, उपसभापती रेखा खरात, माजी सभापती वसंतराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य दत्ता अनपट, पंचायत समिती सदस्या विमल गायकवाड, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, गट विकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कदम, सरपंच जयश्री चव्हाण उपस्थित होते.दहा गावांचा लोकसहभागकक्षात दाखल होणाऱ्या रुग्णांना मुबलक सुविधा पुरविण्यासाठी परिसरातील दहा गावांनी लोकसहभागातून पुढाकार घेतला आहे. कक्षात दोन वेळच्या जेवणाची व नाश्त्याची सोय केली गेली आहे. विविध ग्रामपंचायतीने बाधितांसाठी बेड उपलब्ध केले आहेत. ग्रामसेवक संघटनेने उशा व गाद्या दिल्या आहेत. पहिल्या दिवशी कक्षात नऊ रुग्ण दाखल झाले आहेत.