कऱ्हाड : शासनाच्या नव्या योजना काटेकोरपणे ग्रामीण भागात राबवून त्यांची नियमित प्रसिद्धी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी देणे गरजेचे आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती द्या, व योजनांची जास्तीत जास्त प्रसिद्धी करा, अशा जिल्हा परिषदेच्या कृषी सभातपी शिवाजीराव शिंदे यांनी दिल्यानंतरही त्यांच्या सुचनांचा विसर येथील पंचायत समितीला पडलेला दिसून येत आहे. राज्यशासनाचे पुरस्कार प्राप्त केलेल्या कऱ्हाड पंचायत समितीमध्ये सध्या नव्या आलेल्या योजना या भिंतींवर लावल्या जात असून नोटीस बोर्डावर खासगी कंपनीची प्रसिद्धी केली जात असल्याचे दिसून येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जातात.तसेच एखादी महत्वाची माहिती अथवा शिबिराची माहिती देण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात नोटीस बोर्ड ठेवण्यात आलेले असते. त्या नोटीस बोर्डावर नव्या योजना, अद्यादेश, तसेच महत्वाची माहितीचे तयार करण्यात आलेले सुचनापत्र चिकटवले जाते. जेणे करून कर्मचाऱ्यांना, नागरिकांना ते माहिती होऊ शकेल.मात्र, येथील पंचायत समितीमध्ये योजना या फक्त नावालाच असल्याचे दिसून येत आहे. कारण पंचायत समितीच्या इमारतीमध्ये प्रवेशद्वारावरील नोटीस बोर्ड हे काढून ठेवण्यात आले आहे. तसेच त्याच्यावर एका खासगी कंपनीची जाहिराज चिकटवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे, या नोटीस बोर्डाशेजारी पशुसंवर्धन विभागातील गोवंश हत्याबंदी कायद्याची माहिती देणारे महत्त्वपूर्ण फलक हे भिंतीवर चिकटविण्यात आलेले आहे. त्यामुळे नोटीस बोर्ड असूनही ते खाली काढून ठेवण्यात आल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील समाजकल्याण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग या विभागामध्ये नव्या योजना नेहमी येत असतात. मात्र, त्याची प्रसिद्धी ही मासिक सभेशिवाय दिली जात नाही. शिवाय नव्या योजनांचे एकही फलक हे लावले जात नाहीत. त्यामुळे योजना कधी आल्या आणि कधी निघून गेल्या याची माहिती देखील या ठिकाणी येणाऱ्या सदस्यांना व नागरिकांना मिळत नाही. आता तर कऱ्हाड पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवण्यात आलेले नोटीस बोर्डच काढून ठेवल्याने योजनांची माहिती देणारे फलक लावायचे कोठ?े असा प्रश्न येथील विभागातील कर्मचाऱ्यांना पडला आहे. (प्रतिनिधी)
जाहिराती फलकावर; योजनांचे पत्रक भिंतीवर!
By admin | Published: July 06, 2016 11:43 PM