कातरखटाव : खटाव तालुक्यात गेल्या महिन्यात परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले असून, आठ ते साडेआठ हजार लाभार्थी आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वंच पक्षाच्या मंत्र्यांनी, नेत्यांनी लवाजम्यासहित हजेरी लावली होती. परंतु दिवाळी आली तरी एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे कोरोना संकटातील दिवाळी गोड होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.खटाव तालुक्यातील कान्हरवाडी, कणसेवाडी, एनकूळ, कातरखटाव, पळसगाव, खातवळ, येलमरवाडी, बोबोळे, डांभेवाडी या गावांतील क्षेत्रामध्ये काही ठिकाणी नाला बंडिंग, बंधारे फुटल्याने पिकाबरोबर जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात परतीच्या धो-धो पडणाऱ्या पावसाने खरीप हंगामातील मका, भुईमूग, सोयाबीन, मटकी, मूग, बाजरी ही हातातोंडाला आलेली पिकं पाण्यात गेली आहेत.
अजूनही कान्हरवाडीसह काही भागात शेतामध्ये पाणी दिसून येत आहे. त्यामुळे रब्बी पेरणीचा हंगाम वाया जाण्याची चिन्ह दिसून येत आहेत. दिवाळी तोंडावर आलेली आहे. तरीही प्रशासनाकडून मदतीचा पत्ताच नसल्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.प्रत्येक गावात शेतकऱ्यांचे पाच ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे मेटाकुटीस आलेला शेतकरी ऐन दिवाळीत मदत मिळत नसल्यामुळे पूर्णतः कोलमडलेला दिसून येत आहे. प्रशासनाकडून अजून पंचनामे केलेले कागदोपत्री जमा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असे आश्वासन मिळत असून गेली आठ महिने झाली कोरोनाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचं दिवाळं निघाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे आमचे मका, बाजरी, भुईमूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे जोमाने करण्यात आले आहेत. परंतु भरपाई कधी मिळणार हे कोणीही सांगायला तयार नाहीत. कमीत कमी बियाणांचा तरी खर्च द्या.- बापूराव वाघमारे,शेतकरी, कान्हरवाडी