आॅनलाईन लोकमतमहाबळेश्वर , दि. १९ : महाबळेश्वरात दाखल होणारे हजारो पर्यटक दररोज प्रतापगडावर हजेरी लावतात. मात्र, या किल्ल्याकडे जाणारी वाट बिकट झाल्याने पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत लोकमतमध्ये वाहतूक कोंडीत अडकला प्रतापगडचा रस्ता या मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बांधकाम विभागाने याची दखल घेत प्रतापगडाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. अनेक वर्षांनंतर रस्त्यावर डांबर पडल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.महाबळेश्वर शहरापासून चोवीस किलोमीटर अंतरावर असलेला प्रतापगड किल्लाही पर्यटकांना नेहमीच आकर्षिक करीत असतो. यामुळे महाबळेश्वरला भेट देणारे हजारो पर्यटक प्रतापगडला भेट देतात. पर्यटकांचा हंगाम असो अथवा नसो प्रतापगडावर मात्र पर्यटकांची सतत वर्दळ असते. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून पर्यटकांना खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागता आहेवाडा-कुंभरोशी ते प्रतापगड या चार किलोमीटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली होती. संरक्षक कठडे बांधण्यासाठी लागणाऱ्या दगडी रस्त्याकडेला टाकण्यात आल्या होत्या.या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित विभागाच्या वतीने वाडा-कुंभरोशीहून प्रतापगडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम प्रगतिपथावर असून, पर्यटकांचा उन्हाळी हंगाम सुरू होण्यापूर्वी संबंधित विभागाने तत्परता दाखविल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)वाहतूक कोंडी फुटणार...खराब रस्त्यामुळे प्रतापगडकडे जाणाऱ्या शेकडो पर्यटकांना वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते. वाहतूक पूर्ववत होईपर्यंत अनेकांची दमछाक होत होती. सध्या वाडा-कुंभरोशी-प्रतापगड या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या मिटणार आहे.
अखेर प्रतापगड रस्त्याचे उजळले भाग्य
By admin | Published: April 19, 2017 2:38 PM