पुसेगाव : पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा कमी कष्टात जादा नफा मिळवून देणाऱ्या आधुनिक शेती करण्याकडे शेतकरी वळत आहेत. खटाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांना नावही माहीत नसलेल्या औषधी वनस्पती ‘जिरेनियम’चा पहिला तोडा पवारवाडी (वर्धनगड) ता. खटाव येथील निवृत्त सुभेदार व शेतकरी विश्वनाथ विठ्ठल पवार यांनी यशस्वीपणे घेतला आहे.
सुमारे बावीस गुंठ्यांत त्यांना पहिल्याच कटिंगला १२ टन जिरेनियम निघाले आहे. दुष्काळी भागात शेती जी फायदेशीर ठरेल, अशी सुगंधी व औषधी वनस्पती जिरेनियमची शेती करण्याकडे शेतकरी वळला आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्याच्या दरम्यान या वनस्पतीची लागवड केली जाते. २५ ते ३० अंशसेल्सिअस तापमानात या वनस्पतीची वाढ जोमाने होत असल्याने फेब्रुवारीत लागवड केल्यास चांगला फायदा होतो. या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन चार वर्षे उत्पादन मिळते. पीक एका वर्षात तीनवेळा कापणीला येते. पुन्हा लागण करण्याची गरजच नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक ताण येत नाही. एका एकरमध्ये दहा हजार रोप लागतात.
पहिल्याच वर्षी एकरी सुरुवातीला खर्च ऐंशी हजार येतो. इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खते यामध्ये ७५ टक्के खर्च कमी आहे. एक एकर उसाला पाणी लागेल तेवढ्या पाण्यावर चार एकर जिरेनियमची शेती होऊ शकते. गवत वर्गीय पीक असल्याने त्याला औषध व इतर खर्च फारच कमी प्रमाणात होतो.
या वनस्पतीच्या शेतात आंतरपीक म्हणून शेवगा हे पीक उत्तम असते. या शेवग्याच्या उत्पादनावर लागवडीचा खर्च निघून जातो. या पिकापासून ऑईल निर्मिती केली जाते. एका एकरात तीस ते चाळीस लिटर ऑईल वर्षाला मिळते. एक लिटर ऑईलची किंमत सुमारे बारा हजार हजार रुपये मिळते.
एक एकरमध्ये एका वर्षांत चार ते पाच लाख रुपये किमतीचे तेल संबंधित कंपनीत या वनस्पतीपासून काढले जाते. त्याचा हायडेनसिपरफ्यूम व कॉस्मेटिकसाठी याचा वापर केला जातो. फरफ्युममध्ये जी नैसर्गिकपणा लागतो. ती या मधूनच मिळते. म्हणून जिरेनियम शिवायपर्याय नाही.
चौकट :
बदलत्या हवामानानुसार शेतात कांदा, बटाटा, आले, ऊस ही बिनभरोशाची पिके घेतली जातात. मोठा खर्च करून फायदा होईल का नाही हे शेवटपर्यंत शेतकऱ्यांना समजत नाही. त्यामुळे कमी कष्ट व जादा नफा मिळवून देणारी व हमखास शेतकऱ्यांच्या दारात लक्ष्मी आणणारी सुगंधी व औषधी जिरेनियम शेती शेतकऱ्यांना सक्षम करेल. म्हणूनच अधिकाधिक शेतकऱ्यांनी जिरेनियम शेती करण्याची आवश्यकता आहे.
- विश्वनाथ पवार,
जिरेनियम शेती उत्पादक, पवारवाडी
फोटो ३०पुसेगाव
पवारवाडी (वर्धनगड) येथील विश्वनाथ विठ्ठल पवार यांच्या शेतातील जिरेनियम या सुगंधी वनस्पतीची काटणी सुरू आहे. (छाया केशव जाधव)