नियमांचे उल्लंघन प्रकरणी तीन दुकानांसह आठजणांवर कारवाई
नऊ हजारांवर दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात आज, सोमवारपासून पाच दिवस कडक लॉकडाऊनची घोषणा केली. ही घोषणा होताच रविवारी मलकापुरात नागरिक साहित्य घेण्यासाठी घराबाहेर पडले. त्या त्या दुकानात नागरिक पोहोचल्यामुळे अनेक दुकानांत एकच झुंबड उडाली होती. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध प्रकारच्या तीन दुकानांसह विनामास्क फिरणारे पाच व विनाकारण फिरणाऱ्या तीन अशा आठजणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून नऊ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या दोन महिन्यांतील परिस्थितीनुसार जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन आगामी काळात जिल्हा प्रशासन काय घोषणा करणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी संचारबंदीसह १ जूनपर्यंत जिल्ह्यात पाच दिवस कडक लॉकडाऊनची घोषणा केली. ही घोषणा होताच मलकापुरात घराघरांतील नागरिक तातडीने साहित्य घेण्यासाठी घराबाहेर पडले. अंशतः लॉकडाऊन असतानाही मिळेल त्या दुकानात नागरिक पोहोचल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर दुकानांत एकच झुंबड उडाली होती.
यावेळी छोट्या छोट्या बझारसह दारूच्या दुकानांत गर्दी झाली होती. या गर्दीला आवरताना दुकानदारांना चांगलीच कसरत करावी लागली. बंदी असतानाही सलूनसह दारूविक्रीच्या दुकानांच्या परिसरात दिवसभर गर्दी जाणवत होती. गर्दी झाल्याचे समजताच पोलीस आक्रमक झाले होते. त्यांनी विविध प्रकारच्या तीन दुकानांवर दंडात्मक कारवाई करीत पाच हजार, तर विनामास्क पाच नागरिकांसह विनाकारण फिरणाऱ्या तीन अशा आठ नागरिकांवर प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे चार हजार रुपये असा एकूण नऊ हजार रुपये दंड वसूल केला. असे असताना गांभीर्य नसल्यासारखे अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत होते. त्यामुळे अशा अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
चौकट
शहरात सगळीकडे गर्दी
केवळ पाच दिवसांचा लॉकडाऊन पुकारला असताना शहरातील नागरिकांनी कधीच काहीही मिळणार नाही, या अवस्थेत शहरात गर्दी केली होती. त्यातल्या त्यात शनिवारी दारूच्या दुकानांच्या परिसरात नागरिक घिरट्या मारताना दिसत होते.
कोट
मलकापुरात विविध दुकानांमधून गर्दी होत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम राबवली. शहरातील विविध ठिकाणी कारवाई करीत दुपारी दोन वाजेपर्यंत नऊ हजार रुपये दंड वसूल केला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सायंकाळी पाचनंतर व यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.
- सदाशिव स्वामी
पोलीस उपनिरीक्षक
२३मलकापूर-कारवाई
मलकापूरमध्ये रविवारी खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन दुकानांसह आठजणांवर दंडात्मक कारवाई केली. (छाया : माणिक डोंगरे)
===Photopath===
230521\img_20210523_121820.jpg
===Caption===
फोटो कॕप्शन
लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मलकापुरात वाविध दुकानातून झूंबड उडाली होती. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३ दुकानांसह ८ जणांवर दंडात्मक कारवाई केली. त्याच्याकडून ९ हजारावर दंड वासूल केला. ( छाया-माणिक डोंगरे)