कऱ्हाड : किरकोळ कारणावरून शुक्रवारी दुपारी युवकांच्या दोन गटांत मारामारी झाली. या मारामारीचे पडसाद रात्री उशिरा शहरात उमटले. शहरात युवकांच्या गटाने गाड्यांची तोडफोड केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून काही जणांना ताब्यात घेतले असून, कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. किरकोळ कारणावरून शहरात शुक्रवारी दुपारी युवकांच्या दोन गटांत हमरीतुमरी झाली होती. या हमरीतुमरीचे पर्यवसान त्यावेळी मारामारीत झाले. त्यानंतर ठिकठिकाणी याचे पडसाद उमटले. मात्र, पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेत दोन्ही गटांतील तक्रारदारांची तक्रार नोंदवून घेतल्या. सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदवून घेण्याचे काम सुरू होते. अशातच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास युवकांच्या गटांत पुन्हा धुमश्चक्री उडाली. युवकांनी रस्त्यावरील गाड्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. जमावाने पालिकेची घंटागाडी, कार तसेच दुचाकी अशा सुमारे दहा वाहनांची तोडफोड केली.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. घटनास्थळावरून काही जणांना ताब्यात घेतले आहे. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने रात्री उशिरा शहरात पोलीस बंदोबस्त वाढविला होता. (प्रतिनिधी)
युवकांच्या मारामारीनंतर कऱ्हाडात तोडफोड
By admin | Published: June 26, 2015 10:45 PM