सायगाव : गुजरवाडी, ता. जावळी येथील तलावावर घरगुती गणेश विसर्जनासाठी गेल्यावर हेमंत प्रकाश वाघ (वय १८, रा. सोनगाव, ता. जावळी. मूळ रा. कळंबे, ता. वाई) या युवकाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. सर्वजण ट्रॉलमध्ये बसून घरी जात असताना हेमंत दिसून आला नाही. त्याची कपडे तलावाजवळ आढळल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी त्याचा मृतदेह पाण्यात आढळला.
दरम्यान, गणेश विसर्जनाच्यावेळीच ही घटना घडल्यामुळे सोनगाव व वाघ कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद कुडाळ पोलिसांत झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, हेमंत वाघ हा सोनगाव या आपल्या आजोळी कुटुंबीयासमवेत राहत होता. हेमंत हा मंगळवारी अनंत चतुर्दशी दिवशी घरगुती गणेशविसर्जन करण्यासाठी गुजरवाडी येथील तलावावर गेला होता. यावेळी गावातील तेरा कुटुंबीय गणेश विसर्जनासठी गेली होती. विसर्जनानंतर सर्वजण ट्रॉलीमध्ये बसले. त्यावेळी हेमंत हा कोठेही आढळून आला नाही.
इकडेतिकडे पाहिल्यानंतर त्याची कपडे तलावाजवळ दिसून आली. पण तो नसल्याचेही लक्षात आले. त्यानंतर अनेकांनी तलावातील पाण्यात शोध घेण्यास सुरुवात केली.
बराचवेळ शोध घेतल्यानंतर हेमंतला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले. मृत हेमंतच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
या घटनेची माहिती मिळताच मेढ्याचे पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेची नोंद कुडाळ दूरक्षेत्रात झाली असून हवालदार सूर्यकांत शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.