संजय पाटीलकऱ्हाड : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात असलेल्या करपेवाडी येथील महाविद्यालयीन युवतीच्या खुनाचा अखेर चार वर्षांनी उलगडा झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिच्याच कुटुंबातील एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून नरबळीसाठी हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यादृष्टीने आरोपीकडे पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.ढेबेवाडी विभागातील करपेवाडी येथील भाग्यश्री माने या महाविद्यालयीन युवतीचा २०१९ मध्ये निर्दयपणे खून करण्यात आला होता. संबंधित युवती महाविद्यालयात गेली होती. महाविद्यालयातून परत घरी येताना वाटेतच निर्जनस्थळी तिच्यावर हल्ला करून अज्ञाताने गळा चिरून तिची हत्या केली होती. पुराव्याअभावी सुरुवातीला या प्रकरणाचा तपास ढेपाळला होता. त्यानंतर एकाला पोलिसांनी या प्रकरणात अटक केली.मात्र, अखेरपर्यंत संबंधितांकडून कसलीच माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. गत चार वर्षांपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत होते. अखेर या खुनातील एकेक कडी जोडताना पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून चार वर्षांनी या खुनाला वाचा फोडली आहे. या प्रकरणात कुटुंबातीलच एका व्यक्तीचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सोमवारी रात्रीपासून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.
सातारा: महाविद्यालयीन युवतीच्या खुनाचा अखेर चार वर्षांनी झाला उलगडा, कुटुंबातीलच व्यक्तीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 11:11 AM