सातारा : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह मिळाल्यानंतर शुक्रवारी साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनसमोर पदाधिकाऱ्यांनी चिन्हाचे अनावरण केले. त्याचबरोबर ‘आमची तुतारी, विजयाची’ तयारी अशी गगनभेदी घोषणा करत आगामी निवडणुकीचे रणशिंगही फुंकले.राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यानंतर मागील काही दिवसांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हही उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर गुरूवारी केंद्रीय निवडणूक आयागाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे यापुढे पवार गटाच्यावतीने तुतारी या चिन्हावरच निवडणूक लढविली जाणार आहे. तर शुक्रवारी साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनसमोर तुतारी चिन्हाचे अनावरण करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, शफिक शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘शरद पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे पिछे है, ‘आमची तुतारी, विजयाची तयारी’, अशा या घोषणा होत्या. तसेच यावेळी शिंगही फुंकण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनाच दडपण्याचे काम भाजपकडून होत आहे. अशा या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या भूमितून ही तुतारी फुंकत आहोत. आता राज्यातील जनताच हे जुलमी सरकार घालविल्याशिवाय राहणार नाही. - सुनील माने, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस, शरद पवार गट